पुणे : केंद्र सरकारच्या पंतप्रधान कार्यप्रशिक्षण योजनेच्या (पीएआयएस) तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत देशभरात ३१ हजार ४८० तरुणांना कार्यप्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील सुमारे तीनशे तरूणांना मोठ्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेत येणार आहे. यात पुण्यात कार्यरत असलेल्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांचा समावेश आहे.
या योजनेंतर्गत उमेदवारांचे पात्रता वय १८ ते २५ वर्षे असून, भारतीय नागरिकत्व आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान दहावी, बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधरांचा समावेश असून, असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्णवेळ नोकरी किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार या योजनेसाठी अपात्र असतील. ऑनलाइन अथवा दूरस्थ शिक्षण घेणारे उमेदवार या योजनेसाठी पात्र आहेत. या कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ६ ते ९ महिने असून, उमेदवारांना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. कार्यप्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
तरुणांना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. प्रत्यक्षात उद्योगात काम करून अनुभव मिळविलेले हे तरूण रोजगारक्षम बनतात. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होते. पुण्यातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये रिक्तपदांसाठी उमेदवारांना कार्यप्रशिक्षण करण्याची संधी उपलब्ध आहे. या कंपन्यांमध्ये अर्ज करण्यासाठी मर्यादित कालावधी आहे. उमेदवारांनी pminternship.mca.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करुन रिक्तपदांसाठी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (रास्ता पेठ, पुणे) या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६,१३३६०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले आहे.
जेसीबी, स्कोडासह इतर कंपन्यांचा समावेश
या योजनेमध्ये पुणे जिल्हयामधील जेसीबी इंडिया १२० जागा, क्वीज कार्पो ५० जागा, बेलराईज इंडस्ट्रीज २० जागा, स्कोडा ऑटो फोक्सवॅगन १ जागा, चोलमंडलम इन्व्हेस्टेमेंट आणि फायनान्स १५ जागा, बर्जर पेन्टस् इंडिया १४ जागा, एमक्युर फार्मासूटीकल्स ५ जागा, एचडीएफसी बँक २२ जागा, एच. जी. इन्फ्रा इंजिनिअरिंग ४ जागा, हनीवेल टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लॅब ७ जागा, जे.के. सिमेंट ४ जागा, टेक महिंद्रा २० जागा, द इंडियन हॉटेल्स कंपनी ६ जागा आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.