कराड: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आगाशिव डोंगरावर सीडबॉल प्रत्यारोपण आणि वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर अचानक मधमाशांच्या थव्याने हल्ला चढविल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेत मधमाशांच्या दंशामुळे, तसेच जीव वाचविण्यासाठी धावताना पडल्याने सुमारे ४० विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.
शनिवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान आगाशिव डोंगरावर हा प्रकार घडला. जखमी विद्यार्थ्यांवर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
मलकापूर येथील आगाशिवनगर परिसरातील श्री लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेत पर्यावरणपूरक उपक्रमांना विशेष प्राधान्य दिले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी वृक्षारोपण, बीजारोपण आणि सीडबॉल प्रत्यारोपणाचे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
त्याचाच भाग म्हणून इयत्ता आठवी आणि नववीतील सुमारे ५० विद्यार्थी शिक्षक व कर्मचाऱ्यांसमवेत आगाशिव डोंगरावर गेले होते. वन विभागाच्या कार्यालयामागील परिसरात विद्यार्थी सीडबॉल प्रत्यारोपण आणि वृक्षारोपणाचे काम करत असताना अचानक मधमाशांचा थवा त्यांच्या दिशेने आला. काही क्षणांतच मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढविल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.मधमाशांच्या दंशापासून बचाव करण्यासाठी विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. या धावपळीत अनेक विद्यार्थी घसरून पडले, तर काहींना मधमाशांनी दंश केला. त्यामुळे सुमारे ४० विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविले.
यानंतर सर्व जखमी विद्यार्थ्यांना तातडीने कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्व विद्यार्थ्यांवर आवश्यक उपचार केल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. उपचारानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती समाधानकारक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.