Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वेदांत बंडगर खून प्रकरणातील ९ आरोपींना मोक्काचा कचाटा; कुपवाडमधील 'एन. जी. ग्रुप' टोळीचा कणा मोडला.

वेदांत बंडगर खून प्रकरणातील ९ आरोपींना मोक्काचा कचाटा; कुपवाडमधील 'एन. जी. ग्रुप' टोळीचा कणा मोडला.

सांगली शहरातील गाजलेल्या वेदांत मारुती बंडगर याच्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह त्याच्या "एन. जी. ग्रुप" या संघटित गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका/मोक्का) अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, टोळी प्रमुख निलेश गडदे याच्यासह एका बाल गुन्हेगारासह एकूण ९ आरोपींवर मोक्का कायद्याची कुऱ्हाड कोसळली आहे. या धडक कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

​गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि टोळीचा इतिहास

​संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हे रजिस्टर नंबर २३५/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३ (१), १८९ (४), ३३२ (ए)(सी), ४९, १३ तसेच शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे  पोलीस निरीक्षक संजीव झाडे हे करत होते.

​तपासादरम्यान समोर आले की, टोळी प्रमुख निलेश विठोबा गडदे (रा. वाघमोडे नगर, कुपवाड) याने आपल्या इतर साथीदारांना सोबत घेऊन 'एन. जी. ग्रुप' नावाची एक भयंकर संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. या टोळीतील सदस्य स्वतःच्या उपजीविकेसाठी कोणताही वैध किंवा समाजमान्य व्यवसाय करत नाहीत. सन २०१७ पासून ते आजतागायत या टोळीने सांगली, मिरज, कुपवाड, जत, मिरज ग्रामीण, कवठेमहांकाळ या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत, तसेच शेजारील कर्नाटक राज्यातील कागवाड (जि. बेळगाव) आणि बनहट्टी (जि. बागलकोट) परिसरात गुन्ह्यांची मालिकाच सुरू ठेवली होती.


​दहशत आणि आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी

​'एन. जी. ग्रुप'ने परिसरात स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी आणि आर्थिक लाभासाठी हिंसाचाराचा उघड वापर केला होता. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अपहर करून खंडणी मागणे, बेकायदेशीर घातक शस्त्रे व दारूगोळा बाळगणे, दंगल घडवणे, बेकायदेशीर अंमली पदार्थांची लागवड करणे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. टोळीच्या या वाढत्या उपद्रवामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण होते.
​अशी झाली 'मोक्का'ची कारवाई

​या टोळीच्या कृत्यांचा आणि गुन्हेगारी रेकॉर्डचा सखोल अभ्यास करून, त्यांच्याविरुद्ध 'मोक्का' (MCOCA) कायदा १९९९ ची कलमे ३ (१)(i), ३(१)(ii), ३ (२), ३ (४), ४ वाढवण्यासाठी सांगलीच्या सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता श्रीमती ज्योती डाके यांचा कायदेशीर अभिप्राय घेण्यात आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी हा प्रस्ताव सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे सादर केला.
​पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी प्रस्तावाचे बारीक अवलोकन करून मंजुरीसाठी तो विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे पाठवला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीचा कणा मोडला असून, भविष्यातही अशा टोळ्यांवर कडक नजर ठेवून त्यांचे कायमचे उच्चाटन केले जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

​मोक्का लागलेले आरोपी खालीलप्रमाणे:
​१) निलेश विठोबा गडदे (टोळी प्रमुख, रा. वाघमोडे नगर, कुपवाड)
२) किरण शंकर लोखंडे (वय २५, रा. वाघमोडे नगर, कुपवाड)
३) विशाल बिरुदेव चौगुले (रा. पिंपलवाडी, अग्रण धुळगाव, ता. कवठेमहांकाळ)
४) नानासो ऊर्फ सागर माणिक चौगुले (रा. पिंपलवाडी, अग्रण धुळगाव, ता. कवठेमहांकाळ)
५) अतुल दादासो वायदंडे (वय २८, रा. खंडेराजुरी, ता. मिरज)
६) संदेश ऊर्फ सॅन्डी रामचंद्र घागरे (वय २३, रा. चाणक्य चौक, कुपवाड, मूळ रा. ढालगाव)
७) एक विधीसंघर्षग्रस्त बालक (बाल गुन्हेगार)
८) मलिक सलिम शेख (रा. दत्तनगर, कुपवाड)
९) महमंद जमाल नदाफ (वय ४२, रा. अभयनगर, संजयनगर, सांगली)
विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या मंजुरीनंतर या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास सांगली शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) संदीप भागवत यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

सदरची धडक कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, महादेव पोवार, तसेच पोलीस अंमलदार बसवराज शिरगुप्पी, नागेश कांबळे, इम्रान मुल्ला आणि दिपक गट्टे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.