Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी पोलिस महासंचालक के. के. कश्यप यांचे निधन; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

माजी पोलिस महासंचालक के. के. कश्यप यांचे निधन; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार


पुणे :  राज्याचे निवृत्त पोलिस महासंचालक आणि पुण्याचे माजी पोलिस आयुक्त कमल कृष्ण कश्यप (वय ८१) यांचे सोमवारी निधन झाले. मंगळवारी (ता. ७) दुपारी दीड वाजता येरवडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

के. के. कश्यप यांचा जन्म १२ एप्रिल १९४५ रोजी झाला होता. ते १९६९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते १९९० मध्ये नाशिक शहराचे पहिले पोलिस आयुक्त होते. त्यांनी १९९१-९२ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन यशस्वीपणे केले होते. त्यांनी १९९९ ते २००१ या कालावधीत पुणे पोलिस आयुक्त म्हणून प्रभावीपणे काम पाहिले.

कश्यप हे आपल्या कडक शिस्तीसाठी आणि कामातील पारदर्शकतेसाठी ओळखले जात असत. त्यांनी २००४ ते २००५ या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्यात उल्लेखनीय कार्य केले. महाराष्ट्र पोलिस दलात संवाद साधताना 'जयहिंद' म्हणण्याची जी पद्धत आहे, ती कश्यप यांच्याच संकल्पनेतून सुरू झाली. 

कश्यप यांनी कधीही राजकीय दबावाला बळी न पडता प्रशासकीय स्वायत्तता जपत नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरून वाहनचालक आणि नागरिकांशी थेट संवाद साधत असत. आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने पोलिस दलातील एक शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.