डॉक्टरांची सुरक्षितता हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरलेला आहे. अनेक ठिकाणी हलगर्जीपणाचा आरोप करून डॉक्टरांना मारहाण केली जाते. काहीजण तर डॉक्टरांना थेट शिवीगाळही करतात. डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे कायदेदेखील करण्यात आले आहेत. परंतु या कायद्यांचा अनेकांना धाक नाही. डॉक्टरांना मारहाण झाली तर कायद्यात कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. परंतु तरीदेखील अशा प्रकारचे गुन्हे होतच राहतात. सध्या याचीच प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका महिला डॉक्टरला, नर्सला तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही सध्या समोर आला असून एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण व धक्काबुक्की झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही मारहाण शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनी केली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वाद घालत मारहाण करत असल्याचे त्यांचे CCTV फुटेज समोर आले आहे. फुटेजमध्ये महिला डॉक्टर फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा मोबाईल हिसकावून खाली पाडल्याचेही दिसून येत आहे.
डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि धमकावल्याचा आरोप करण्यात आला असून घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे. नगरसेवकांसह त्यांच्या सहकाऱ्यांचाही मारहाणीत सहभाग असल्याचे CCTV फुटेजमधून समोर येत असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या घटनेनंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, आता नगरसेवकाने डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना नेमकी का मारहाण केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु आता या प्रकरणी काय कारवाई केली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.