Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टाॅवर गायब, टेन्शन संपलं! BSNL चा थेट उपग्रहाशी कनेक्ट होणारा 'सॅटेलाईट फोन' लाँच; किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

टाॅवर गायब, टेन्शन संपलं! BSNL चा थेट उपग्रहाशी कनेक्ट होणारा 'सॅटेलाईट फोन' लाँच; किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!


नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या दूरसंचार कंपनीने सॅटेलाइट फोन बाजारात आणल्याची घोषणा गुरूवारी केली. या फोनची किंमत १ लाख ३४ हजार रुपये असून, संरक्षण, सागरी वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील सॅटेलाइट दूरसंचार सेवेचा विस्तार होण्यास यामुळे मदत होणार आहे.
बीएसएनएलने समाज माध्यमावर गुरुवारी सॅटेलाइट फोनची घोषणा केली. कंपनीने स्पष्ट केले की, सॅटेलाइट फोनची किंमत १ लाख ३४ हजार १६६ रुपये (सर्व करांसहित) आहे. आव्हानात्मक परिस्थितीत आणि दुर्गम भागात मोबाईलचे दूरसंचार जाळे उपलब्ध नसते अशा ठिकाणी वापर करण्याच्या दृष्टीने सॅटेलाइट फोनची रचना करण्यात आली आहे. संरक्षण, सागरी वाहतूक, आपत्ती व्यवस्थापन, खाणकाम, दुर्गम भागातील मोहिमा आणि साहसी पर्यटन या क्षेत्रातील आव्हानात्मक परिस्थितीत हा फोन उपयोगी ठरेल. बीएसएनएलच्या नजीकच्या कार्यालयात ग्राहक या फोनसाठी संपर्क साधू शकतील.
बीएसएनएलच्या सॅटेलाइट फोनसाठी सरकारी आणि खासगी संस्थांसाठी 'पोस्टपेड प्लॅन' उपलब्ध आहेत. त्यात सरकारी संस्थांसाठी दरमहा ३ हजार ५०० रुपये आकारले जातात आणि त्यात २० मिनिटांचा मोफत टॉकटाईम मिळतो. तसेच, वार्षिक ३८ हजार ५०० रुपयांच्या प्लॅनमध्ये २४० मिनिटे मोफत टॉकटाईम मिळतो. खासगी संस्थांसाठी दरमहा ५ हजार ८३५ रुपये व ३० मिनिटे मोफत टॉकटाईम आणि वार्षिक ६४ हजार १८५ रुपये व ३६० मिनिटे मोफत टॉकटाईम असे प्लॅन आहेत. मोफत टॉकटाईम संपल्यानंतर सरकारी संस्थांना प्रतिमिनिट १८ रुपये आणि खासगी संस्थांना प्रतिमिनिटे २५ रुपये आकारले जातात, असे बीएसएनएलने स्पष्ट केले आहे.

सेवा २०१८ पासून सुरू

बीएसएनएलने या आधी फेब्रुवारी महिन्यात म्हटले होते की, कंपनी ग्लोबल सॅटेलाइट फोन सेवेच्या (जीएसपीएस) माध्यमातून कंपनी कॉल आणि एसएमएसची सेवा सर्वसामान्य ग्राहक आणि खासगी कंपन्यांना १ जानेवारी २०१८ पासून देत आहे. या सेवेसाठी ग्राहकाने आवश्यक तपशील देणे बंधनकारक आहे. त्यात ही सेवा वापरण्याचे ठिकाण, वापरण्याचा कालावधी आणि हेतू याची माहिती ग्राहकाला द्यावी लागते.

मोबाईल क्रमांकावर प्रतिसाद नाही
बीएसएनएलने समाज माध्यमावर या फोनच्या माहितीसाठी मोबाईल क्रमांक दिला आहे. मात्र, हा क्रमांकावर प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी केली आहे. याबाबत बीएसएनएलकडे विचारणा केली असता कंपनीकडून उत्तर मिळालेले नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.