बॉबी देओलच्या चाहत्यांसाठी मोठी आणि बहुप्रतिक्षित बातमी समोर आली आहे. त्याच्या सर्वाधिक गाजलेल्या 'आश्रम' या वेब सीरिजच्या चौथ्या सिझनची शूटिंग अखेर सुरू झाली आहे. बाबा निरालाच्या भूमिकेत बॉबी देओल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
निर्माते प्रकाश झा प्रॉडक्शन्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची अधिकृत घोषणा केली आहे. 'आश्रम 4' लिहिलेला क्लिपबोर्ड असलेला फोटो शेअर करत 'एक और आरंभ.. आश्रम के नए अध्याय में आपका स्वागत है. जपनाम', असं त्यावर लिहिलेलं आहे. ही पोस्ट समोर येताच चाहत्यांनी कमेंट्समध्ये आनंद व्यक्त केला आहे. गेल्या काही काळापासून 'आश्रम 4'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.
पुन्हा बाबा निरालाच्या भूमिकेत बॉबी
या सीरिजमध्ये बॉबी देओलने साकारलेली बाबा निराला ही व्यक्तिरेखा त्याच्या करिअरमधील सर्वाधिक चर्चेत आलेल्या भूमिकांपैकी एक ठरली. धर्म, राजकारण, गुन्हेगारी आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून आपलं साम्राज्य उभं करणाऱ्या एका स्वयंघोषित बाबाची ही कथा आहे. या सीरिजच्या प्रत्येक सिझनमध्ये त्याच्या साम्राज्यातील नवनवीन रहस्यं आणि संघर्ष समोर आले आहेत.
जुने कलाकारही दिसणार
'आश्रम 4'मध्ये बॉबी देओलसोबत आधीच्या सिझनमधील अनेक कलाकार पुन्हा दिसणार आहेत. अदिती पोहणकर पुन्हा पम्मीच्या भूमिकेत, तर चंदन रॉय सन्याल भोपा स्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, ईशा गुप्ता, अध्ययन सुमन आणि त्रिधा चौधरी यांच्याही भूमिका कायम राहण्याची अपेक्षा आहे.
'आश्रम'च्या पहिल्या तीन सिझनमध्ये आश्रमातील काळे कारनामे, सत्ता, गुन्हेगारी आणि बाबा निरालाचं साम्राज्य याभोवती कथा फिरताना दिसली. तिसऱ्या सिझनच्या अखेरीस बाबा निराला तुरुंगात जातो. त्यानंतर भोपा स्वामी आश्रमाची धुरा सांभाळतो. पम्मीसुद्धा आश्रमातच राहण्याचा निर्णय घेते. त्यामुळे पुढील कथानक नेमकं कुठून सुरू होणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
कधी होणार रिलीज?
सध्या 'आश्रम 4'च्या शूटिंगला सुरुवात झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असली तरी नव्या सिझनच्या रिलीज डेटची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मागील सिझनप्रमाणेच हा सिझन एमएक्स प्लेअरवर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे. आश्रमचा पहिला सिझन 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर तिसरा सिझन 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता चौथ्या भागाची शूटिंग सुरू झाल्याने बाबा निरालाच्या साम्राज्यात पुढे काय घडणार, याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.