सांगली : अन्न-औषध प्रशासनाने कमी मनुष्यबळातही कारवाईचा धडाका लावला असून, त्यामुळे अन्न भेसळ करणारे आणि प्रतिबंधित पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या चार महिन्यांत या विभागाने विविध कारवायांमध्ये तब्बल ४१ जणांना गजाआड केले (41 )जणांना अटक
३४ आस्थापनांना सील ठोकले आहे. जिल्ह्यात आयुक्त तुकाराम मुंडे यांचा 'इफेक्ट' जोरदार दिसून येत आहे. सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे आणि सहायक आयुक्त नीलेश मसारे यांच्या नेतृत्वाखाली शहर व जिल्ह्यात या कारवाया करण्यात आल्या आहेत.
अन्न-औषध प्रशासनाने हॉटेल, ढाबे, दूध डेअरी, संकलन केंद्रे, दुग्धजन्य पदार्थांची विक्री यांसह प्रतिबंधित गुटखा व अन्य पदार्थांच्या विक्रीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. छापेमारी वेगाने सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून विविध आस्थापनांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवणे पसंत केले आहे. या कारवाईत सातत्य राहावे, अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. राज्यात अन्न-औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी ज्या तडफेने कारवाई सुरू केली आहे, त्याचा परिणाम दिसून येत आहे.
नागरिक स्वतः तक्रारी करू लागले आहेत. हॉटेलमध्ये मोफत शुद्ध पाणी दिले जात आहे. 'पनीर' वापरताना 'बचत' नको, अशी भूमिका घेतली जात आहे. गूळ व्यापाऱ्यांवर छापासत्र सुरू झाल्याने व्यापारीदेखील हादरून गेले आहेत. गेल्या चार महिन्यांत ३३६ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यांपैकी ८३ नमुने प्रमाणित आढळले, तर १४ नमुन्यांत कमी दर्जा आढळून आला. पाच नमुने असुरक्षित अन्नपदार्थ म्हणून समोर आले.
अद्याप २३४ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. विविध आस्थापनांच्या तपासणीचाही धडाका लावण्यात आला आहे. या काळात ४४६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. सुधारणांसाठी १७६ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या. ६२ परवाने निलंबित करण्यात आले. बदल केल्यानंतरही सुधारणा न झाल्याने ११० खटले दाखल झाले. त्यांपैकी ६८ निकाली काढण्यात आले असून, ४२ प्रलंबित आहेत. या कारवाईतून ८ लाख ३१ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
दृष्टिक्षेपात कारवाई
भेसळीवर कारवाई
छाप्यांची संख्या : २०
जप्त साठा : ५९ हजार ६४५ किलो
किंमत : ९२ लाख १५ हजार रुपये
प्रतिबंधित अन्नपदार्थांवर कारवाई
छाप्यांची संख्या : ४०
जप्त साठा : १ कोटी १७ लाख ४२ हजार रुपये
आस्थापना सील : ३४
अटक आरोपी : ४१.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.