मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी बोलणे, न बोलणे, मराठी माणसांना घर नाकारण्यावरुन सातत्याने वाद झाल्याचं पाहायला मिळतं. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरात अलिशान इमारतीमध्ये विक्रीसाठी असलेल्या एका घराची जाहिरात करताना हे घर मांसाहार करणाऱ्यांना मिळणार नाही, असे वक्तव्य करणारा प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीकेची प्रचंड झोड उठली होती. तर, मनेसेनंही त्यांला दिसेल तिथं ठोका, असा पवित्रा घेतला. आता, त्या भावेश कावरेनं मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली.
भावेश कावरेच्या व्हिडिओमुळे मुंबईत मांसाहार करणाऱ्या मराठी लोकांना घरे नाकारण्याचा मुद्दा पुन्हा तापला होता. त्यावर भावेश कावरे यांनी स्पष्टीकरण देऊनही हा वाद शमला नव्हता. त्यामुळे आता भावेश कावरे हा मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या भेटीला आला होता. मात्र, राज ठाकरेंची भेट त्याला न मिळाल्याने तो अमित ठाकरे यांना भेटला. या भेटीत भावेश कावरेने अमित ठाकरेंसमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुठलीही सफाई न देता बिनशर्त माफी मागण्याचा सल्ला अमित ठाकरेंनी दिला. तसेच, तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो, असे म्हणत अमित ठाकरे बैठकीला आलेल्या भावेश कारवरेवर संतापल्याचंही पाहायला मिळालं.अमित ठाकरे म्हणाले, ती बिल्डिंग शाकाहारी आहे, हे कोण बोललं? त्यावर नाही ते फक्त फ्लॅटसाठी होतं, असं भावेशने म्हटले. मात्र, त्यावर अमित ठाकरे चिडले, फक्त ते फ्लॅटसाठी होतं, मी संपूर्ण व्हिडीओ पाहिला आहे, तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो, अशा शब्दात अमित ठाकरेंनी संपात व्यक्त केला. तसेच, तुला या गोष्टी कळल्या पाहिजे, तुझ्या घरच्यांना काय वाटलं असेल. तू उगाच थोड्याशा पैशांसाठी मुंबईच्या लोकांमध्ये तणाव निर्माण केला, थोड्या पैशांसाठी आणि प्रसिद्धीसाठी. सोडून द्या ना पैसे, असेही अमित ठाकरेंनी यावेळी भावेशला सांगितले.
पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवणार
दरम्यान, मनसेचे उप-शहर प्रमुख योगेश सावंत आणि भांडुपचे पदाधिकारी भावेश कावरेसोबत अमित ठाकरेंच्या भेटीला आले होते. मनसेने याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तर, कांजूरमार्ग मधील त्याच्या कार्यालयावर मनसेने आंदोलनही केले होते. त्यामुळे, अमित ठाकरेंच्या भेटीसाठी भावेश आला होता. त्यानंतर, तो कांजूरमार्ग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.