कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. प्लास्टर उपलब्ध नसल्याने एका व्यक्तीच्या फॅक्चर झालेल्या पायाला प्लास्टरऐवजी चक्क पुठ्ठा लावण्यात आला.
रुग्णालयाने प्लास्टर बाहेरून आणण्यास सांगितल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. 'व्हिडिओ पाहिला आहे. याबाबत माहिती घेऊन सांगते. अस्थिरोगतज्ज्ञ ओपीडीच्या वेळेत असतात,' असे रुग्णालयाच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी सांगितले. बेतूरकरपाडा परिसरातील रहिवासी राम सोनी यांच्या पायाला फॅक्चर झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात आणले होते.प्लास्टर उपलब्ध नसल्याने ते बाहेरून आणा असे सांगत सोनी यांच्या पायाला पुठ्ठा लावण्यात आला, असे जखमीचा मुलगा अभय सोनी यांनी सांगितले. यावर रुग्णालयाने ऑर्थोपेडिक डॉक्टर नसल्यामुळे प्लास्टर करता आले नसल्याचे म्हटले आहे. या प्रकाराची माहिती मिळताच मनसेचे नगरसेवक गणेश लांडगे रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णालयातील दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करून कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याप्रकरणी संबंधितांवर ठोस कारवाईची मागणी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.