सांगली एसीबीची धडक कारवाई: जमिनीच्या नोंदीसाठी ६ हजार रुपयांची लाच मागणारा कडेगावचा मंडल अधिकारी आणि खाजगी इसम जाळ्यात; गुन्हा दाखल
सांगली :- जमिनीच्या खरेदीदस्ताची नोंद मंजूर करणे आणि हरकतीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी ६,००० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कडेगावचे मंडल अधिकारी मनोहर थौडिराम पाटील आणि खाजगी इसम राजेंद्र विष्णू पाटील यांच्यावर कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईनंतर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयित लोकसेवक मनोहर पाटील यांना तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदाराच्या खरेदीदस्तावर आलेल्या हरकतीची सुनावणी तक्रारदाराच्या बाजूने करून नोंदीला मंजुरी देण्यासाठी मंडल अधिकाऱ्याने लाचेची मागणी केली होती. त्यासाठी तक्रारदाराला खाजगी इसम राजेंद्र पाटील याच्याकडे जाण्यास सांगितले. राजेंद्रने मंडल अधिकाऱ्यासाठी ५,००० रुपये आणि स्वतःच्या कामाचा मोबदला म्हणून १,००० रुपये, अशी एकूण ६,००० रुपयांची उघड मागणी केली.
एसीबीची पडताळणी आणि अटक:
तक्रारदाराने सांगली एसीबीकडे धाव घेतल्यानंतर, ७ जुलै रोजी केलेल्या पंचांसमक्ष पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाली. त्यानुसार २४ ऑगस्ट रोजी कडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्याच रात्री मंडल अधिकारी मनोहर पाटील यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोराले, उप-अधीक्षक यास्मिन इनामदार आणि पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सांगली एसीबीच्या पथकाने केली. शासकीय कामासाठी लाच मागितल्यास नागरिकांनी घाबरून न जाता एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.