मुंबई : क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स नियमाअंतर्गत राज्यातील रुग्णालये, नर्सिंग होम, डायग्नोस्टिक सेंटर, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आणि इतर संबंधित वैद्यकीय आस्थापनांची तपासणी करण्याचे निर्देश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार या वैद्यकीय आस्थापनांमध्ये विविध कायदे, नियम व निर्धारित निकषांचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्यात येऊन त्यात आढळणाऱ्या त्रुटींवर नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वैद्यकीय आस्थापनांमध्ये आवश्यक नियम, मानके आणि सुविधा उपलब्ध असणे हे रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे या आस्थापनांच्या तपासणीसाठी विशेष तपासणी मोहीम सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत हाती घेण्यात आली आहे. या तपासणीसाठी जिल्हा व महापालिका क्षेत्रात पथके नियुक्त करून त्यांच्यामार्फत प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान संबंधित आस्थापनाकडे आवश्यक नोंदणी, परवाने तसेच लागू असलेल्या कायदे व नियमांनुसार आवश्यक सुविधा आणि व्यवस्था उपलब्ध आहेत की नाही, याची पडताळणी केली जाणार आहे.तपासणीदरम्यान अनियमितता किंवा नियमभंग आढळल्यास त्याची नोंद करून संबंधित संस्थेला अनुपालनासाठी आवश्यक निर्देश देण्यात येणार आहेत. त्यानंतरही त्रुटी कायम राहिल्यास नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. तपासणीसाठी विभागनिहाय पथकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी व पथकांनी प्रत्यक्ष संस्थांना भेट देऊन तपासणी करावी, तसेच तपासणीचा अहवाल निर्धारित नमुन्यात सादर करावा, अशा सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
दैनंदिन अहवाल सादर करण्याची व्यवस्था
विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात येणाऱ्या तपासणीची दैनंदिन नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र 'दैनंदिन अहवाल प्रारूप' तयार करण्यात आले आहे. या नमुन्यात जिल्ह्याचे नाव, तारीख, तपासणी करणाऱ्या पथकाचे नाव, भेट दिलेल्या संस्थांची संख्या, विविध कायदे व नियमांचे पालन करणाऱ्या संस्थांची संख्या तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांची संख्या नोंदविण्याची व्यवस्था आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह हा अहवाल सादर करावा लागणार आहे.
नियमभंग करणाऱ्या संस्थांची स्वतंत्र नोंद
विविध कायदे व नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांची स्वतंत्र माहिती संकलित केली जाणार आहे. त्यामध्ये ”नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांचा तपशील” हा स्वतंत्र नमुना देण्यात आला आहे. या नमुन्यात संस्थेचे नाव, तपासणीदरम्यान आढळलेली अनियमितता, अनुपालनाची सद्यस्थिती आणि संबंधित निरीक्षणे नोंदविण्यात येणार आहेत. त्यामुळे केवळ तपासणी करून अहवाल सादर करण्याऐवजी संबंधित संस्थेने आढळलेल्या त्रुटींचे निराकरण केले की नाही, यावरही लक्ष ठेवले जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.