जळगाव महावितरण हादरले! अधीक्षक अभियंत्यावर निलंबनाची कुऱ्हाड; जाणून घ्या काय आहे प्रकरण

जळगाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) जळगाव मंडळातील वीज वितरण व्यवस्थेतील ढिसाळ कारभार, वाढती थकबाकी, ट्रान्सफॉर्मर नादुरुस्ती आणि वीज चोरीच्या प्रकरणांवर अपेक्षित कारवाई न केल्याचा ठपका ठेवत अधीक्षक अभियंता विनोद चंद्रकांत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

कल्याण येथील कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी त्यासंदर्भात आदेश जारी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव मंडळातील वीज वितरण व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून काही गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे. मंडळातील विविध भागांत ट्रान्सफॉर्मर नादुरुस्तीचे वाढलेले प्रमाण, ग्राहकांकडील कोट्यवधींची थकबाकी तसेच वीज चोरीची अनेक प्रकरणे प्रलंबित असतानाही त्यावर अपेक्षित पद्धतीने कारवाई झाली नसल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. वीज वितरण कंपनीसाठी थकबाकी वसुली, वीज चोरीला आळा घालणे आणि नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती करणे ही महत्त्वाची जबाबदारी असते. मात्र, जळगाव मंडळात या बाबींमध्ये अपेक्षित कामगिरी झाली नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. परिणामी अधीक्षक अभियंता म्हणून पाटील यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासकीय जबाबदारी निश्चित करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

निलंबनाची अशी आहेत कारणे

जळगाव मंडळाच्या कार्यक्षेत्रात वीज चोरीची तब्बल २१६९ प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणांमध्ये नियमानुसार कारवाई करून कंपनीचा महसूल सुरक्षित करण्याची आवश्यकता होती. मात्र, या प्रकरणांवर प्रभावी कारवाई न झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वीज चोरीमुळे महावितरणच्या महसुलावर थेट परिणाम होत असताना एवढ्या मोठ्या संख्येने प्रकरणे प्रलंबित राहणे ही गंभीर बाब मानली जात आहे. जळगाव मंडळातील ग्राहकांकडील वीज बिलांची थकबाकी ६७ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. थकबाकी वसुलीसाठी प्रभावी नियोजन आणि सातत्याने पाठपुरावा अपेक्षित असताना अपेक्षित परिणाम साधता आला नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. मोठ्या प्रमाणातील थकबाकीमुळे कंपनीच्या महसुलावर परिणाम होत असल्याने या बाबीचीही निलंबनाच्या कारवाईत गंभीर दखल घेण्यात आली आहे.

नाशिकला द्यावी लागणार हजेरी

जळगाव मंडळातील विविध भागांमध्ये ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले होते. ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे ग्राहकांना दीर्घकाळ वीजपुरवठ्यापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती किंवा बदल करून वीजपुरवठा सुरळीत ठेवणे अपेक्षित असते. मात्र, या आघाडीवरही समाधानकारक कामगिरी झाली नसल्याचे निरीक्षण वरिष्ठ पातळीवर नोंदविण्यात आले. महावितरणच्या कर्मचारी सेवा विनियमातील तरतुदींनुसार विनोद पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय मुख्य अभियंता, नाशिक परिमंडळ येथे निश्चित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांनी प्रत्येक सोमवार आणि शुक्रवारी नाशिक येथे हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महावितरणच्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष

जळगाव मंडळाच्या प्रमुख पदावर कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावरच निलंबनाची कारवाई झाल्याने महावितरणच्या प्रशासकीय वर्तुळात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. वीज वितरणातील कार्यक्षमता, महसूल वसुली आणि वीज चोरी विरोधातील कारवाईला वरिष्ठ पातळीवरून किती गांभीर्याने घेतले जात आहे, याचे हे स्पष्ट संकेत मानले जात आहेत. आता पाटील यांच्या निलंबनानंतर जळगाव मंडळातील वीज वितरण व्यवस्था, थकबाकी वसुली, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती आणि वीज चोरीच्या प्रलंबित प्रकरणांवर महावितरण प्रशासनाकडून कोणती पुढील पावले उचलली जातात, याकडे जळगाव जिल्ह्यातील वीज ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.