सांगली : जय परशुराम ब्राह्मण सेवा संस्थेच्या वतीने सांगली शहरासह जिल्ह्यात श्रावणी महामहोत्सव विधिवत, उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सांगलीचे युवराज यांनी श्रावणी विधीत सहभागी होत नवीन जानवे धारण केले.
श्रावण महिन्यात जानवे बदलण्याचा धार्मिक विधी म्हणजे श्रावणी. गेल्या दोन वर्षांपासून सांगलीत विविध ब्राह्मण संघटनांच्या सहभागातून हा विधी एकत्रितपणे आयोजित केला जात आहे. यंदा संस्थेचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी यांनी या धार्मिक सोहळ्याला ‘श्रावणी महामहोत्सव’ असे स्वरूप दिले. परशुराम जयंतीप्रमाणेच या उपक्रमात ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला. शहरासह विविध केंद्रांवर उत्साहात श्रावणी विधी पार पडला.
सांगलीतील गणपती मंदिर, सुनीती भवन आणि विश्रामबाग येथील वाडीकर मंगल कार्यालयात, तर मिरज येथील गजानन मंगल कार्यालय, सिद्धराज हॉल आणि गोरे मंगल कार्यालयात श्रावणी विधीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कवठेमहांकाळ आणि ईश्वरपूर येथेही श्रावणी उत्साहात साजरी करण्यात आली.
विश्रामबाग येथील वाडीकर मंगल कार्यालयातील कार्यक्रमास आमदार , सौ. अंजलीताई गाडगीळ तसेच गुरुजी यांची उपस्थिती होती. सुनीती भवन येथे नाना महाराज केळकर यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
परंपरा, संस्कृती आणि संस्कारांची जपणूक व्हावी, तसेच समाजातील एकता आणि सुसंस्कृतपणा अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महामहोत्सवाचे सर्वत्र कौतुक झाले. धार्मिक विधीसोबतच समाजाला एकत्र आणणारा उपक्रम म्हणूनही या सोहळ्याकडे पाहिले गेले.
गणपती मंदिर येथे हणमंत पटवर्धन गुरुजी, तर विश्रामबाग येथे कावेरी गुरुजी यांनी श्रावणी विधीचे संचलन केले. शास्त्रोक्त पद्धतीने धार्मिक विधी पार पाडण्यात आला.
दरम्यान, ब्राह्मण संघटनेला अधिकृत नोंदणी मिळाली असून आगामी काळात समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अरुण कुलकर्णी यांनी दिली. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करत त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानले.
श्रावणी महामहोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक परंपरेसोबत सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.