वाढदिवसासाठी आणलेल्या केकमध्ये मृत पाल आढळल्याचा धक्कादायक दावा नालासोपाऱ्यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा केक खाल्ल्यानंतर 7 ते 8जणांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली असून, त्यांना उपचारासाठी नालासोपारा येथील विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील नीलकंठेश्वर बिल्डिंगमध्ये एका मुलीच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी समोर असलेल्या चामुंडा डेअरी येथील केक शॉपमधून केक खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना उपस्थितांनी केक खाण्यास सुरुवात केली. मात्र, केक खात असतानाच त्यामध्ये मृत पाल आढळल्याचा दावा करण्यात आला. केकमध्ये पाल दिसताच उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, हा केक खाल्लेल्या काही जणांची त्यानंतर प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.
केक खाल्ल्यानंतर 7 ते 8 जण रुग्णालयात
या घटनेनंतर 7 ते 8 जणांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. केकमध्ये मृत पाल आढळणे आणि त्यानंतर केक खाल्लेल्या व्यक्तींची प्रकृती बिघडणे यामुळे कुटुंबीयांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. मात्र, संबंधित व्यक्तींची प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली, याबाबत अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळे केक खाल्ल्यामुळेच सर्वांची प्रकृती बिघडली का, याची वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक आहे.
केक कुठून आला? पाल कशी आली?
रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये उर्मिला वर्मा (32), सलोनी गुप्ता (16), सुदीक्षा शाह (19), आफिया इद्रिस (24), रुबी शाह (40), शिव गुप्ता (10), प्रियांश वर्मा (2), परी यादव (7), प्रिया वर्मा (8), रुद्र शाह (13) आणि प्राची यादव (8) यांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर केक नेमका कोणत्या परिस्थितीत तयार करण्यात आला? तो तयार करताना किंवा पॅकिंग करताना स्वच्छतेची योग्य काळजी घेण्यात आली होती का? केकमध्ये पाल कशी आली? तसेच संबंधित दुकानातून विक्री करण्यात आलेल्या इतर खाद्यपदार्थांची स्थिती काय आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेची अधिकृत पुष्टी आणि संबंधित प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आता या प्रकरणात नेमकी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.