छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये जामीन मिळवण्यासाठी एका व्यक्तीने चक्क छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रमेश सिन्हा यांच्या छायाचित्राचा वापर करून जादूटोण्याचा प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
मध्यरात्री स्मशानभूमीत संशयास्पद हालचाली
हा प्रकार शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री सिपत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवरी गावातील स्मशानभूमीत घडला. रात्री उशिरा चार जण संशयास्पद पद्धतीने काही विधी करत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. गावकऱ्यांनी त्यांना जाब विचारल्यानंतर तिघे जण तेथून पळून गेले. मात्र ऋषिकेश कुमार याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
घटनास्थळी मासा, लिंबू अन् कुंकू
बिलासपूरचे पोलिस अधीक्षक राजनेश सिंह यांच्या माहितीनुसार, घटनास्थळावरून तांत्रिक विधीसाठी वापरले जात असल्याचे दिसणारे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये मासा, लिंबू, कुंकू तसेच छायाचित्रे आढळली. या छायाचित्रांमध्ये छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रमेश सिन्हा यांच्यासह आणखी दोन व्यक्तींचे फोटो होते.
नातेवाईकाला जामीन मिळावा म्हणून विधी?
पोलिसांच्या चौकशीत ऋषिकेश कुमारने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा नातेवाईक प्रियांशु बोले याला काही अन्य व्यक्तींसह चाकू हल्ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यातील एका आरोपीला जामीन मिळाला होता, मात्र इतर आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयात प्रलंबित होते. यानंतर ऋषिकेश आणि त्याचे तीन मित्र एका तांत्रिकाचा व्हिडीओ पाहून या कथित विधीच्या कल्पनेपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांनी सांगितले. हा विधी केल्यास न्यायालयातून जामीन मिळू शकतो, असा दावा त्या व्हिडीओमध्ये करण्यात आला होता.
आरोपी आणि पीडिताचाही फोटो सापडला
घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या छायाचित्रांपैकी एक फोटो प्रियांशु बोलेचा, तर दुसरा चाकू हल्ल्यातील पीडित व्यक्तीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुख्य न्यायाधीशांचा फोटो या विधीत नेमका कशासाठी वापरण्यात आला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
'विधी करून जामीन मिळत नाही'
पोलिस अधीक्षक राजनेश सिंह यांनी अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. "कोणताही विधी करून जामीन मिळवता येत नाही. गुन्हेगारांनी स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, घटनास्थळावरून मिळालेल्या वस्तू आणि छायाचित्रांच्या आधारे पोलिस अधिक माहिती गोळा करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.