"राजकीय ड्रामा बंद करा आणि." राहुल गांधींच्या पत्राला भाजपचे प्रत्युत्तर, काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी (२४ ऑगस्ट) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले होते.
सरकारी वसतिगृहात राहण्याची वयोमर्यादा आणि अपमानास्पद नियमांविरोधात विद्यार्थी १० दिवसांपेक्षा जास्त काळापासून उपोषणाला बसले आहेत.
आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी राहुल गांधी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर भाजपने काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. बहुतांश आदिवासी वसतिगृहे काँग्रेस नेत्यांचीच असल्याचा आरोप भाजपने करत ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे.
भाजपने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “आम्ही तुमच्याकडून निष्पक्ष किंवा सखोल अभ्यास केलेल्या विचारांची अपेक्षा करत नाही, परंतु जनतेला काही तथ्ये नक्कीच माहित असणे आवश्यक आहे,” असे पक्षाने म्हटले आहे. ज्या आदिवासी शाळांबाबत विद्यार्थी आंदोलन करत आहेत, त्यातील काही शाळा काँग्रेस नेत्यांकडून चालवल्या जात असल्याचे पक्षाने नमूद केले आहे.
भाजपचे काँग्रेसला उत्तर
काही दिवसांपूर्वी एका आश्रमशाळेत तीन मुलींचा मृत्यू झाला, ज्या शाळेचे संचालक मारोतराव कोवासे हे काँग्रेसचे माजी खासदार आहेत. त्यांचा मुलगा विश्वजित कोवासे हा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष असून या शाळेचा सचिव आहे, असे भाजपने सांगितले.
तसेच पक्षाने यवतमाळ येथील चिंधुजी लक्ष्मणराव पुरके आश्रमशाळेचाही उल्लेख केला. पक्षाच्या माहितीनुसार, यवतमाळ येथील चिंधुजी लक्ष्मणराव पुरके आश्रमशाळेच्या तपासणीदरम्यान मुलींच्या स्वच्छतागृहांना दरवाजेच नसल्याचे आढळून आले. ही शाळा काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री वसंत पुरके यांच्याकडून चालवली जाते.
काँग्रेस सत्तेत असताना या शाळांवर चुकीच्या पद्धतीने ताबा मिळवून त्यांचा गैरवापर करण्यात आला. ज्या लोकांनी वर्षानुवर्षे आदिवासी समाजाचे शोषण केले, तेच लोक आज कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्यांमागे लपत आहेत. या काँग्रेस नेत्यांवरील कारवाई रोखण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही,” असे भाजपने स्पष्ट केले आहे.
‘जनतेला आता काँग्रेसची कार्यपद्धती समजली’
जनतेला आता राहुल गांधी आणि काँग्रेसची कार्यपद्धती स्पष्टपणे समजली असल्याचे भाजपने म्हटले आहे. आधी स्वतः चुकीची कामे करायची आणि कारवाई सुरू झाल्यावर गदारोळ घालायचा. राहुल गांधी यांनी हा राजकीय ड्रामा बंद करावा आणि काँग्रेस नेत्यांना पाठीशी घालणे तसेच संरक्षण देणे थांबवावे, असेही भाजपने म्हटले आहे.
‘आधी तेलंगणा आणि कर्नाटकात सुधारणा करा’
महाराष्ट्र शासन येथील आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे, राहुल गांधी यांनी महाराष्ट्राकडे पाहण्यापूर्वी तेलंगणा आणि कर्नाटक या स्वतःची सत्ता असलेल्या राज्यांमधील आदिवासी कल्याण विभाग आणि वसतिगृहांची व्यवस्था सुधारावी, असा सल्लाही भाजपने राहुल गांधी यांना दिला आहे.
‘अभ्यास कमी असला की जास्त बढाया मारू नये’
याशिवाय आणखी एक पोस्ट शेअर करत “अभ्यास कमी असला की जास्त बढाया मारू नये म्हणतात ते काही खोटे नाही. महाराष्ट्राच्या भूमीत येऊन महिला सक्षमीकरण शिकवणाऱ्या राहुल गांधींनी आधी स्वतःच्या पक्षात डोकावून पाहिलं असतं तर बरं झालं असतं,” असे म्हणत काँग्रेसशासित राज्यातील महिला मंत्र्यांच्या संख्येचे पोस्टर शेअर केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.