शरद पवारांचा शिष्य, निर्णयांचा धडाका अन् एका वक्तव्याने राजीनामा; 'त्या' राजकीय वादळाची धग आजही कायम!
आर. आर. आबा पाटील हे नाव अवघ्या महाराष्ट्राला परिचयाचे आहे. १६ अॉगस्ट म्हणजे आज त्यांची जयंती आहे. सांगली जिल्ह्यातील अंजनी या गावातून आबांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
त्यांची राजकीय कारकीर्द अत्यंत खडतर होती. ते चांगले वक्ते असल्यानेच पुढे याचा मोठा फायदा त्यांना आपल्या राजकीय कारकीर्द संभाळताना झाला. त्यांचा राजकारणात असलेला आदर आजही नेते कटाक्षाने पाळतात. शरद पवारांच्या तालमीत तयार झालेला नेता अशी त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे.
त्यांच्याबद्दल अनेक आठवणी अनेकांकडून सांगितल्या जातात. अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले. पण ज्यावेळी आबा गृहमंत्री पदावर होते, त्यावेळी त्यांच्याकडून अनवाधानेने गेलेल्या एका विधानामुळे त्यांना या पदावरुन पायउतार व्हावे लागले. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? त्यांची राजकीय सुरूवात, दिवंगत नेते अजित पवार यांच्यासोबत असलेले संबंध याविषयी जाणून घेऊयात…
बोलायला संधी मिळाली आणि….
आर. आर. आबा पाटील यांचे पूर्ण नाव रावसाहेब रामराव पाटील. ते मूळचे सांगली जिल्ह्यातले. अंजनी या गावातून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी सांगलीची वाट धरली. ज्या महाविद्यालयात ते शिक्षणासाठी आले होते. त्याचे प्राचार्य पी बी पाटील यांनी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शांतिनिकेतन सुरू केलेले. त्यात आबा दाखल झाले. याच काळात त्यांच्यातील वक्ता घडायला सुरुवात झाली. त्यावेळी सांगली आकाशवाणी केंद्रांची स्थापना झाली होती. महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्ताने बोलायला वक्त्यांची गरज असायची. मग शांतिनिकेतन मध्ये शिकणाऱ्या आबांना त्यात बोलायला संधी मिळाली आणि तिथून पुढे त्यांची वाटचाल बहरत गेली. कला शाखेची पदवी मिळवली. त्यानंतर एलएलबी करून ते कायद्याचे पदवीधर झाले.
ज्यावेळी आबा कायदा पदवीचा अभ्यास करत होते. त्यावेळी घडलेल्या घडामोडींमुळे ते जिल्हा परिषद निवडणुकीला उभे राहिले. शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी एका मातब्बर नेत्याला पराभवाची धुळ चारली. तिथूनच त्यांच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा झाला. त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून केलेल्या कामाची लोक आजही आठवण काढतात.
सामान्य माणसाला आबा आधार वाटायचे
१९९० चा काळ होता, त्यावेळी आबा आमदार झाले आणि पहिल्यांदा विधानसभेत गेले. त्यांनी प्रभावी कामगिरी केली. १९९० ते २०१४ या काळात तासगाव विधानसभा मतदार संघातून ते निवडून आले. त्यांनी ग्रामविकास, गृहमंत्री म्हणून काम पाहिले. ग्रामविकास मंत्री असताना ग्रामस्वच्छता अभियान त्यांनी सुरू केले. त्याची दखल देशपातळीवर घेतली गेली. तर गृहमंत्री असताना त्यांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. ज्याची चर्चा राज्यभरात झाली. पोलीस भरतीमध्ये आबांनी पारदर्शक पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे गरीब घरातील शेकडो पोरं पोलीस झाली. आबा मंत्री झाले पण त्यांनी आपली मूळे विसरली नाहीत. सामान्य माणसाला आबा आधार वाटायचे. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांचा लोकांवर मोठा प्रभाव होता. आबा हयात नाहीत पण त्यांची केलेली कामगिरी आणि घेतलेले निर्णय राज्याच्या राजकारणात दखल घेणारे ठरतात.
ते विधान आणि राजीनामा
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत ‘बडे शहरों मे ऐसी छोटे बातें होती रहेती हैं…’ या एका विधानामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. नैतिकता म्हणून आबांना त्यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
अजित पवार जाहीर भाषणात म्हणाले होते..
अजित पवार आणि आर. आर. पाटील (आबा) यांचे संबंध राजकीय सहकाऱ्यांचे होते, ज्यामध्ये परस्पर आदर, स्नेह तसेच काही राजकीय मतभेद आणि तणावही पाहायला मिळाला. दोघांनी एकाच पक्षात (राष्ट्रवादी काँग्रेस) दीर्घकाळ सोबत काम केले होते. ७० हजार कोटी रुपयांच्या कथित सिंचन घोटाळ्याची उघड्या चौकशी (ओपन इन्क्वायरी) करणाऱ्या फाईलवर तत्कालीन गृहमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांनी सही केली होती, ज्यामुळे आपल्याला धक्का बसल्याचे आणि विश्वासघाताची भावना वाटल्याचे अजित पवार यांनी जाहीरपणे सभेतून बोलून दाखवली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.