तामिळनाडूचे मुख्यमंत्री व टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय हे धडाकेबाज निर्णय घेत आहेत. राज्यात अनेक लोककल्याणकारी योजनेच्या घोषणा करून त्याची अंमलबाजणी करणारा विजय यांच्या सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय आहे. तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी देण्यात येणारी प्रसूती रजा आता 12 आठवड्यांवरून 365 दिवस करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन अपत्यांप्रमाणेच तिसऱ्या अपत्यासाठीही महिला कर्मचाऱ्यांना वर्षभराची प्रसूती रजा मिळणार आहे.
मानव संसाधन व्यवस्थापन मंत्री डी. सरथकुमार यांनी मंगळवारी राज्य विधानसभेत आपल्या विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान ही घोषणा केलीय. सरथकुमार म्हणाले, तामिळनाडू सरकार हे कल्याणकारी प्रशासन असून, सामाजिक कल्याण आणि महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देते. त्यामुळे महिला सरकारी कर्मचाऱ्यांना तिसऱ्या अपत्यासाठी सध्या मिळणारी 12 आठवड्यांची प्रसूती रजा वाढवून 365 दिवस करण्यात येणार आहे.
यापूर्वी काय होता नियम?
सध्याच्या नियमानुसार, दोनपेक्षा कमी जिवंत अपत्ये असलेल्या विवाहित महिला सरकारी कर्मचाऱ्यांना 365 दिवसांची प्रसूती रजा मिळते. मात्र, दोन किंवा त्यापेक्षा अधिक जिवंत अपत्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतनासह जास्तीत जास्त 12 आठवडे म्हणजेच 84 दिवसांची रजा मिळत होती. तामिळनाडूमध्ये सुरुवातीला महिला सरकारी कर्मचाऱ्यांना 90 दिवसांची प्रसूती रजा दिली जात होती. 2011 मध्ये एआयएडीएमके सरकारने ती सहा महिन्यांपर्यंत, तर 2016 मध्ये नऊ महिन्यांपर्यंत वाढवली. त्यानंतर जुलै 2021 मध्ये डीएमके सरकारने पात्र महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा एक वर्ष म्हणजेच 365 दिवस केली. दोन किंवा त्यापेक्षा अधिक जिवंत अपत्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी 12 आठवड्यांची तरतूद सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर आणि त्यानुसार राज्य सरकारने केलेल्या सुधारणांमुळे लागू करण्यात आली होती.
नवजात बाळाला घेऊन विधानसभेत आल्या TVK आमदार
या घोषणेच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच आमदार झालेल्या टीव्हीकेच्या आर. पल्लवी यांनी नवजात बाळाला विधानसभेत आणल्याची घटना चर्चेत आली होती. पल्लवी यांनी आपल्या बाळाला विधानसभेच्या परिसरात आणले आणि सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी बाळाची देखभाल करण्यासाठी एका केअरटेकरकडे सोपवले. सभागृहाजवळील एका खोलीत केअरटेकर बाळाची देखभाल करत होता. कामकाजात सहभागी झाल्यानंतर पल्लवी पुन्हा बाळाकडे गेल्या. बाळाला सोबत आणल्याबद्दल सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना पल्लवी म्हणाल्या की, "मी नवजात बाळाला घरी सोडू शकत नाही. दुसऱ्या व्यक्तीच्या वेदना समजल्या नाहीत तरी चालेल; पण कृपया ट्रोल करू नका."
तामिळनाडूचा प्रजनन दर 1.4 पेक्षा कमी
तिसऱ्या अपत्यासाठी प्रसूती रजा वाढवण्याचा निर्णय तामिळनाडूमधील घटत्या प्रजनन दराच्या पार्श्वभूमीवरही महत्त्वाचा मानला जात आहे. रविवारी दक्षिण भारतातील प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संस्थेच्या कार्यशाळेत आरोग्यमंत्री अरुणराज यांनी सांगितले की, तामिळनाडूचा एकूण प्रजनन दर (Total Fertility Rate) 1.4 पेक्षा खाली गेला आहे. हा दर लोकसंख्येची पिढ्यान्पिढ्या पुनर्स्थापना होण्यासाठी आवश्यक असलेल्या 2.1 च्या पातळीपेक्षा लक्षणीय कमी आहे. तामिळनाडूच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16 टक्के नागरिक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यामुळे लोकसंख्येतील हा बदल सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.