🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमरावती अग्निकांड: नर्सने प्राणाची बाजी लावून बाळ वाचवले, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे निष्पापांचे बळी!

अमरावती अग्निकांड: नर्सने प्राणाची बाजी लावून बाळ वाचवले, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे निष्पापांचे बळी!


अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षात आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर कक्षात अडकलेल्या सहा बाळांना परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत बाहेर काढले असून, त्यांच्यावर शेजारील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यापैकी काही बाळांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नवजात शिशू कक्षातील व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यानंतर आग लागली आणि काही क्षणांतच ती वेगाने पसरली. आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या दोन परिचारिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाळांना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी पेट्यांमध्ये ठेवलेल्या इवल्याशा बाळांना एकामागून एक बाहेर काढले.
या घटनेबाबत बोलताना नर्सने सांगितले की, *"आमच्यासमोर फक्त लहान बाळं होती. आग खूप भीषण होती, पण आम्हाला स्वतःची चिंता वाटली नाही. सर्वत्र धूर पसरल्यामुळे काहीच दिसत नव्हते. आम्ही शक्य तितके प्रयत्न केले, मात्र तीन बाळांना वाचवता आले नाही."* बाळांना बाहेर काढताना त्यांच्या हातांनाही भाजले असून त्यांनी आपल्या भाजलेल्या हातांवर उपचार सुरू असल्याचे सांगितले.
आगीची तीव्रता इतकी होती की, नवजात शिशू कक्षातील एसी आणि इतर उपकरणे जळून खाक झाली. व्हेंटिलेटरचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे, जिल्हा स्त्री रुग्णालयाची ही इमारत अवघ्या वर्षभरापूर्वीच सुरू झाली होती. त्यामुळे आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित का झाली नाही, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर तीन नवजात शिशू अतिदक्षता कक्ष असून, प्रत्येकी १३ अशा एकूण ३९ बालकांवर उपचार करण्याची क्षमता आहे. यापैकी एका कक्षात ही आग लागली. घटनेच्या वेळी त्या कक्षात १२ बाळांवर उपचार सुरू होते. डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले, मात्र दाट धुरामुळे तीन नवजात बालकांचा गुदमरून मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आग लागण्याच्या कारणासह रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेची चौकशी करण्याची मागणी होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.