मुंबई : सोमवारपासून बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. रविवारी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्या झालेल्या बैठकीनंतर बँकांचा संप मागे घेण्यात आला आहे.
रविवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात बँक संपाबद्दल बैठक झाली, या बैठकीमध्ये सुधारणांसह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. बऱ्याच चर्चेनंतर दोघांमध्ये काही निर्णयांबाबत सहमती झाली आहे, त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला आहे.
बैठकीमध्ये काय झालं?
रविवारी रात्री इंडियन बँक असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात बँकेच्या संपाबाबत बैठक झाली. या बैठकीमध्ये सुधारणांसह स्केल IV आणि त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांसाठी PLI स्कीममध्ये बदल यांच्यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
शनिवारी सुट्टी द्यायच्या मुद्द्यावर इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्या हाय लेव्हल कमिटीची स्थापना केली जाणार आहे. ही कमिटी संभाव्य पर्यायांबाबत विचार करेल आणि चर्चा करून निर्णय घेईल, ज्यामुळे कुणाचीच गैरसोय होणार नाही. कमिटी असा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करेल, जो बँक, कर्मचारी आणि ग्राहक यांना मान्य असेल.
तर स्केल IV आणि त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांसाठी PLI म्हणजेच परफॉर्मन्स लिंक इनसेनटिव्ह स्कीम बद्दलही बैठकीत चर्चा झाली. कामगिरीवर पगारवाढ या स्कीमबद्दलचे बँक युनियनचे आक्षेप पाहता यामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवण्याबद्दल IBA सोबत चर्चा सुरू केली जाईल. याशिवाय 8 मार्च 2024 च्या बैठकीची मिनीट्स (कार्यवृत्त) मधल्या इतर मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठीही दोन्ही बाजूंमध्ये चर्चा होईल.या सर्व निर्णयांमुळे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स ने प्रस्तावित आंदोलन आणि संप मागे घेण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे बँकेचा प्रस्तावित 3 दिवसांचा संप टळला आहे. पुढचे 3 दिवस संप पुकारल्यामुळे बँक कर्मचारी 27 सप्टेंबरला रविवार असूनही कामावर आले होते, त्यामुळे बँक सुरू होत्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.