सोलापूर हादरलं! २५ वर्षांपूर्वीचा जुना वैमनस्य पेटला; माजी नगरसेवक लालचंद वाधवाणी यांच्यावर विधीवेळीच कोयत्याने प्राणघातक हल्ला
सोलापूर : सोलापूरातील सिंधी समाजाचे माजी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लालचंद वाधवाणी (वय ८०) यांच्यावर २५ वर्षांपूर्वीच्या जुन्या वादातून कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. गुरुनानक चौक परिसरातील सिंधी कॉलनीमध्ये एका उठावणाच्या (पगडी विधी) कार्यक्रमादरम्यान शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. या हल्ल्यात वाधवाणी यांच्या उजव्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले असून, संतप्त नागरिकांनी संशयीताचा पाठलाग करून पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले.
प्रकाश किसनदास आडवाणी असे संशयित आरोपीचे नाव असून, तो वाधवाणी यांचा नातेवाईकच असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुनानक चौक परिसरातील सभागृहात सिंधी समाजातील एका व्यक्तीचा उठावणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या विधीसाठी लालचंद वाधवाणी उपस्थित राहिले होते. सायंकाळी कार्यक्रम सुरू असताना आरोपी प्रकाश आडवाणी दुचाकीवरून सुमारे तीन फुटांचे धारदार शस्त्र घेऊन तेथे पोहोचला. सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे असलेले वाधवाणीवर काही समजण्याच्या आतच आरोपीने त्यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली.
खाली पडल्याने वार पायावर
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. हल्ल्यादरम्यान वयोवृद्ध वाधवाणी खाली कोसळले. त्यामुळे संशयीताने केलेला वार थेट त्यांच्या पायांवर बसले. यात वाधवाणी यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले असून गुडघा व पोटरीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना उपस्थितांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्या पायावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले. हल्ला केल्यानंतर आरोपी प्रकाश आडवाणी हातात शस्त्र घेऊन दुचाकीवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, एका नागरिकाने त्याला लाथ मारून पाडण्याचा प्रयत्न केला. गडबडीत आरोपीची दुचाकी दुसऱ्या वाहनाला धडकल्याने तो रस्त्यावर पडताच उपस्थितांनी त्सास पकडून चोप देत सदर बाजार पोलिसांच्या ताब्यात दिले.
२५ वर्षांपूर्वीचा जुना वाद
सुमारे २५ वर्षांपूर्वी सिंधी समाजाच्या पातळीवर झालेल्या एका कौटुंबिक निर्णयात अन्याय झाल्याची भावना संशयातीची होती, त्या जुन्या वादाचा राग मनात धरूनच हा पूर्वनियोजित हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या हल्ल्याचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला असून, सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.