सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत नागरी सहकारी पतसंस्था मतदारसंघातून ज्येष्ठ नेते तथा कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्ह्यातील पतसंस्थांना सक्षम नेतृत्व मिळावे तसेच पतसंस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून नागरिकांना अधिक प्रभावीपणे पतपुरवठा व सेवा उपलब्ध करून देता यावी, या उद्देशाने आपण निवडणुकीत उतरलो असल्याचे पाटील यांनी सांगितले. सहकारी पतसंस्था गटातून आपल्या उमेदवारीला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील,आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, पक्षाचे नेते श्री. शेखर इनामदार आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. “पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपवल्यास ती मी समर्थपणे पार पाडेन. पक्षाने उमेदवारी कायम केल्यास सर्वांना सोबत घेऊन निवडणूक ताकदीने लढवून विजयी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे,” असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी पतसंस्था आणि जिल्हा बँक यांच्यातील समन्वय वाढविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी काकासाहेब धामणे, सुहास पाटील (बोलवाड), दिलीप कांबळे, श्रेणिक पाटील व प्रकाश पाटील (वसगडे), प्रमोद शेटे, पै. धीरज कांबळे, बापू शेटे, इंद्रजीत पाटील, अभिजीत पाटील (ब्रह्मनाळ), विपुल पाटील यांच्यासह कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.