तुम्ही रोज वापरत असलेला साबण, शाम्पू किंवा टूथपेस्ट शाकाहारी आहे की मांसाहारी? हे आता तुम्हाला दुकानात खरेदी करतानाच लगेच समजणार आहे. केंद्र सरकारने कॉस्मॅटिक्स आणि सौंदर्यप्रसाधनांच्या पॅकेजिंगसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार, आता या उत्पादनांवर ती शाकाहारी आहेत की मांसाहारी, हे स्पष्टपणे दर्शवणारे चिन्ह छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील वृत्त NDTV या वृत्तसंस्थेने दिले आहे.
काय आहे नवा नियम?
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ‘लीगल मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) रूल्स, २०११’ मध्ये दुरुस्ती करून हे नवीन नियम लागू केले आहेत. यासंदर्भातील शासकीय अधिसूचना जारी करण्यात आली असून, हे नियम तातडीने लागू झाले आहेत.
या नवीन बदलामुळे ग्राहकांना खरेदी करताना खालीलप्रमाणे खुणा पाहायला मिळतील:
शाकाहारी उत्पादने : ज्या उत्पादनांच्या निर्मितीत कोणत्याही प्राणिजन्य घटकांचा वापर केलेला नाही, अशा पॅकेटवर ‘हिरवा ठिपका’ असेल.मांसाहारी उत्पादने : प्राणिजन्य घटकांचा समावेश असलेल्या उत्पादनांच्या पॅकेटवर ‘लाल किंवा तपकिरी ठिपका’ छापणे अनिवार्य असेल.पॅकेटवर कुठे असणार हे चिन्ह?नव्या नियमांनुसार, हे चिन्ह उत्पादनाच्या पॅकेटवरील मुख्य भागावर म्हणजेच ग्राहकांना सहज दिसेल अशा बाजूला छापावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणतीही अडचण न होता उत्पादनाचा प्रकार एका नजरेत ओळखता येईल.
ग्राहकांसाठी हा निर्णय का महत्त्वाचा?
अनेकदा सौंदर्यप्रसाधने, टूथपेस्ट किंवा साबण बनवताना प्राण्यांची चरबी किंवा इतर प्राणिजन्य घटकांचा वापर केला जातो. मात्र, पॅकेटवर स्पष्ट उल्लेख नसल्याने सामान्य ग्राहकांना याची माहिती मिळत नव्हती. अनेक ग्राहक आपल्या धार्मिक, सांस्कृतिक किंवा वैयक्तिक आवडीनुसार पूर्णपणे शाकाहारी उत्पादनांचा वापर करणे पसंत करतात. सरकारच्या या निर्णयामुळे आता ग्राहकांचा हक्क अधिक बळकट झाला असून, त्यांना स्वतःच्या पसंतीनुसार योग्य उत्पादनाची निवड करणे अधिक सोपे होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.