🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'जरांगेच वाळूचोर! जेलमध्ये टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही'; अजय बारस्करांचा थेट हल्लाबोल!

'जरांगेच वाळूचोर! जेलमध्ये टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही'; अजय बारस्करांचा थेट हल्लाबोल!


जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी संबंधित व्यक्तींवर अवैध वाळू उत्खननाच्या प्रकरणावरून ह. भ. प. अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केले आहेत. "वाळू चोरीसाठी मनोज जरांगे पाटीलदेखील जबाबदार आहेत. तहसीलदार आणि जरांगे जेलमध्ये जाणार असून, त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा बारस्कर यांनी दिला आहे. 

बारस्कर यांच्या तक्रारीनंतर संजय नानासाहेब कटारे यांच्याशी संबंधित अवैध वाळू उत्खनन प्रकरणात महसूल विभागाने कारवाई केली आहे. अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव आणि डोमलगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातील 2000 ब्रास अवैध वाळू उत्खनन प्रकरणात 18 जणांवर एकूण 4 कोटी 90 लाख 72 हजार 200 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. मात्र, संजय कटारे यांच्या आक्षेपानंतर तत्कालीन तहसीलदारांनी त्यांना दंडाच्या कारवाईतून वगळले होते.

कटारेंना दंडातून वगळण्याचा आदेश रद्द -
अजय बारस्कर यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी 21 सप्टेंबर 2026 रोजी संजय कटारे यांना दंडातून वगळणारा तत्कालीन तहसीलदारांचा आदेश रद्द केला. कटारे यांच्याशी संबंधित गट क्रमांक 262 वरील 4 कोटी 90 लाख 72 हजार 200 रुपयांचा बोजा पूर्ववत करण्यात आला असून, ही रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तत्कालीन तहसीलदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव देण्याचेही निर्देश आहेत. 

'संजय कटारे आणि 11 जणांनी 4 कोटींची वाळू चोरली' -

अजय बारस्कर यांनी संजय कटारे यांच्यावरही गंभीर आरोप केले. "संजय कटारे आणि अन्य 11 जणांनी मिळून कोट्यवधी रुपयांची वाळू चोरली. शासनाच्या पैशाची चोरी झाली असेल, तर ती उघड करण्याचा मला अधिकार आहे," असा दावा बारस्कर यांनी केला. तसेच "मनोज जरांगे यांनी संजय कटारे यांच्याशी आपला कोणताही संबंध नाही, हे स्पष्ट करावे," अशी मागणीही बारस्कर यांनी केली. जरांगे यांच्या जवळच्या व्यक्तींवरही त्यांनी आरोप केले आहेत.

'जरांगेंना डिफेंडर गाडी कोणी दिली?'
मनोज जरांगे यांच्या वापरातील डिफेंडर वाहनावरूनही बारस्कर यांनी सवाल उपस्थित केला. "जरांगेंना डिफेंडर गाडी कोणी दिली? आरक्षणाची लढाई जिंकली नाही, मग हार कशासाठी घालायचा? डिफेंडर उगाच कोणी कोणाला देत नाही," असा सवाल त्यांनी केला. याचवेळी भोसले नावाच्या व्यक्तीच्या व्यवसायाचा आणि कथित तपास यंत्रणांच्या कारवाईचा संदर्भ देत बारस्कर यांनी काही आरोप केले.
'पत्रकारांना बैठकीच्या वेळी बाहेर का ठेवलं?'

मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना बारस्कर यांनी "मी पत्रकारांपासून काहीही लपवत नाही, असं जरांगे म्हणतात; मग बैठकीच्या वेळी पत्रकारांना बाहेर का ठेवण्यात आलं?" असा सवाल उपस्थित केला. बारस्कर आणि जरांगे यांच्यात यापूर्वीही आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. 2024 मध्येही बारस्कर यांनी जरांगे यांच्या आंदोलनातील कथित बैठका आणि कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.