🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलांना का होतो टाईप-१ डायबेटीस?, तिपटीने वाढला धोका; 'हे' आहे कारण, वेळीच व्हा सावध

मुलांना का होतो टाईप-१ डायबेटीस?, तिपटीने वाढला धोका; 'हे' आहे कारण, वेळीच व्हा सावध


शास्त्रज्ञ आणि डॉक्टर आत्तापर्यंत असं मानत होते की, लहान मुलांमध्ये होणारा टाईप-१ डायबेटीस हा प्रामुख्याने फॅमिली हिस्ट्री किंवा जीन्समुळे होतो. मात्र एका नवीन मेडिकल रिसर्चमध्ये या आजाराचं आणखी एक प्रमुख कारण समोर आलं असून यामुळे लहानपणी डायबेटीस होण्याचा धोका थेट तीन पटीने वाढतो.

विशेष म्हणजे हे कारण आपल्या आतड्यांमध्ये असलेल्या बॅक्टेरियाच्या बिघाडाशी संबंधित आहे. 'इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' (ICMR) आणि 'इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशन' (IDF) च्या आकडेवारीनुसार, भारतात १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ९५,६०० ते १ लाख लहान मुलांना टाईप-१ डायबेटीस आहे. 'नेचर मेटाबॉलिझम' मध्ये प्रकाशित झालेल्या या नवीन संशोधनानुसार, 'गट मायक्रोबायोम'चा समतोल बिघडल्याने टाईप-१ डायबेटीसचा धोका थेट तीन पटीने वाढतो. ज्या मुलांच्या 'गट मायक्रोबायोम'चा विकास लहानपणीच अचानक थांबला, त्यांच्यामध्ये टाईप-१ डायबेटीस होण्याचा धोका हा मायक्रोबायोमचा विकास व्यवस्थित सुरू असलेल्या मुलांच्या तुलनेत तिप्पट आढळला.

गट मायक्रोबायोम म्हणजे काय?
गट मायक्रोबायोम हा आपल्या आतड्यांमध्ये राहणाऱ्या उपयुक्त बॅक्टेरिया आणि व्हायरसचा असा समूह आहे, जो शरीरात सहजासहजी न पचणारा फायबर आणि गुंतागुंतीचे कार्बोहायड्रेट्स पचवण्यास मदत करतो. याशिवाय हा मायक्रोबायोम व्हिटॅमिन-के आणि काही बी-व्हिटॅमिन्स तयार करण्याचं काम करतो. आपल्या शरीराची ७०% रोगप्रतिकारशक्तीही पोटातच ठरते.

बाळ जन्माला आल्यानंतर जसे मोठे होते, तसे हे बॅक्टेरिया त्याच्या इम्युन सिस्टीमला बाहेरून येणाऱ्या आजारांशी कसं लढायचं आणि शरीराच्या स्वतःच्या अवयवांचं रक्षण कसं करायचं याचं प्रशिक्षण देतात. परंतु, काही कारणांमुळे चांगले बॅक्टेरिया कमी होऊन हानिकारक बॅक्टेरिया वाढले, तर रोगप्रतिकारशक्तीचं हे पूर्ण प्रशिक्षण कोलमडतं. 
गट मायक्रोबायोम बिघडल्याने कसा होतो डायबेटीस?

रिसर्चमध्ये असं नमूद केलं आहे की, जेव्हा आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया कमी होतात, तेव्हा आतड्यांची आतील थर कमजोर होतो. याला मेडिकल भाषेत 'लीकी गट' म्हणतात. यामुळे आतड्यांमधील काही विषारी घटक आणि अपूर्ण पचलेले प्रोटीन्स रक्तामध्ये लीक होतात. हे पाहून शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा अलर्ट होते.

येथेच इम्युन सिस्टीमचा गोंधळ उडतो. विषारी घटकांशी लढण्याच्या नादात ही यंत्रणा शत्रूची ओळख विसरते आणि चुकीने मुलांच्या पॅनक्रियाजमधील 'बीटा सेल्स'ला शत्रू समजून त्यांच्यावर हल्ला करतं आणि त्यांना नष्ट करतं. परिणामी इन्सुलिन तयार होणे पूर्णपणे बंद होतं आणि मुलाला डायबेटीस होतो.

गट मायक्रोबायोम का बिघडत आहे?

अँटीबायोटिक्सचा अतिवापर करणं.

जास्त प्रमाणात अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न खाणं.

निसर्गापासून दूर राहणं आणि बाहेर न खेळणं.

लहानपणी आईचे दूध पुरेसं न मिळणं.

पालकांनी काय काळजी घ्यावी?
टाईप-१ डायबेटीजमध्ये अनुवंशिकतेचा भाग असला, तरी पोटाचं आरोग्य सुधारून या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतो.

आहार - मुलांना घरी बनवलेलं ताजं ताक, इडली आणि ऋतूनुसार हिरव्या पालेभाज्या द्या. हे अन्नपदार्थ आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना वाढवण्यास मदत करतात.

औषधं - डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना अजिबात अँटीबायोटिक्स देऊ नका.

लक्षणं - जर मूल अचानक खूप जास्त पाणी पिऊ लागलं, रात्री वारंवार लघवीला जात असेल, भूक लागूनही वजन घटत असेल किंवा खूप सुस्त राहत असेल, तर तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.