भाईंदर : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने आता पोलिसांच्या ऑन-ड्युटी व्यसनांवर थेट लगाम घातला आहे. कर्तव्यावर असताना पोलीस अधिकारी किंवा अंमलदारांनी तंबाखू, गुटखा, मावा, खरा यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन तसेच मद्यपान करू नये, असे स्पष्ट आणि सक्त आदेश आयुक्तालयाने जारी केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कठोर खात्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. आयुक्तालयाचे मुख्यालय व विशेष शाखा पोलीस उपआयुक्त संजयकुमार पाटील यांनी या यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. पोलीस अधिकारी आणि अंमलदार कर्तव्यावर असताना थेट पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे कर्तव्य बजावताना त्यांच्या वर्तनातून पोलीस दलाची शिस्त आणि प्रतिमा दिसून येते. अशा परिस्थितीत तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन किंवा मद्यपान करणे हे अशोभनीय असून, पोलीस खात्याच्या शिस्तीला धरून नसल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच या आदेशाची व्याप्ती केवळ पोलीस ठाण्यापुरती मर्यादित नसून शासकीय कार्यालये, पोलीस ठाणी, शासकीय वाहने आणि कर्तव्य बजावण्याच्या ठिकाणी तंबाखू, गुटखा, मावा, खरा यांसारख्या पदार्थांचे सेवन करण्यास तसेच मद्यपान करण्यास मनाई करण्यात आली आहे. आयुक्तालयाच्या अखत्यारीतील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि विविध शाखांच्या अधिकार्यांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यांच्या अधीनस्थ अधिकारी किंवा कर्मचार्यांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध तात्काळ खात्यांतर्गत कारवाई करण्याचे अधिकारही प्रभारी अधिकार्यांना देण्यात आले आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी ऑन-ड्युटी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, यासाठी स्वतंत्र आणि स्पष्ट परिपत्रक काढण्यात यावे, अशी लेखी मागणी समाजसेवक सचिन जांभळे यांनी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.