🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आटपाडीत चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या ७० वर्षीय नराधमाला जन्मठेप; ३ लाख ४० हजारांचा दंड!

आटपाडीत चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या ७० वर्षीय नराधमाला जन्मठेप; ३ लाख ४० हजारांचा दंड!


सांगली:- बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना न्यायालयात कठोर शिक्षा घडवून आणण्यात सांगली पोलीस दलाला मोठे यश मिळाले आहे. आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार आणि पोक्सो (POCSO) कायद्याअंतर्गतच्या गुन्ह्यात विटा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ७० वर्षीय आरोपीला दोषी ठरवत जन्मठेप आणि ३ लाख ४० हजार रुपये द्रव्यादंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त १५ महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी व घटना

सप्टेंबर २०१७ मध्ये गळवेवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील काळेलवस्ती परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपी शिवाजी कोंडीबा काळेल (वय ७० वर्षे) याने दोन अल्पवयीन पीडित बालकांना चॉकलेटचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना पाय चेपण्यास लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी अनिता मनु निषाद यांनी २६ जुलै २०१८ रोजी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपीवर भादंवि कलम ३७६ (आय)(१), ३७६ (ए)(बी) सह पोक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.

​तपास आणि कोर्टातील कारवाई
तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी २ ऑगस्ट २०१८ रोजी आरोपीला अटक केली. तत्कालीन पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली व अंमलदार दिग्विजय कराळे यांच्या सहकार्याने भक्कम पुरावे गोळा करून विटा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

​न्यायालयात विशेष केस क्र. ६१/२०२४ अंतर्गत खटला चालला. सरकारी वकील ॲड. आरती महानंद देशपांडे-साटविलकर यांनी बाजू मांडताना एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये पीडित बालके, डॉक्टर, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आणि फिर्यादी यांची साक्ष अत्यंत निर्णायक ठरली.
न्यायालयाचा अंतिम निर्णय

सर्व साक्षी, वैद्यकीय अहवाल व तांत्रिक पुरावे ग्राह्य धरून विटा येथील मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. आर. भागवत यांनी आरोपी शिवाजी काळेल याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पोलीस पथकाचे विशेष योगदान
छत्तीसगड येथे निघून गेलेल्या फिर्यादी व साक्षीदारांना पोलीस संरक्षणात न्यायालयात आणणे तसेच पीडित बालकांची व्हीसी (Video Conferencing) द्वारे साक्ष नोंदवून घेण्याची महत्त्वपूर्ण भूमिका पोलीस निरीक्षक संतोष पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण गुरव यांनी बजावली.

​या यशस्वी कारवाईबद्दल सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव शेलार यांच्यासह तपासी अधिकारी सुधाकर देडे, सरकारी वकील आरती देशपांडे व पैरवी पथकाचे विशेष कौतुक होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.