🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नरभक्षक की भोंदूगिरी? चितेतील जळतं मांस खाणाऱ्या तथाकथित 'अघोरी'चा संतापजनक व्हिडिओ; खाक्या दाखवत पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

नरभक्षक की भोंदूगिरी? चितेतील जळतं मांस खाणाऱ्या तथाकथित 'अघोरी'चा संतापजनक व्हिडिओ; खाक्या दाखवत पोलिसांनी आवळल्या मुसक्या!


उज्जैन : स्मशानभूमीत बेकायदेशीरपणे घुसखोरी करून अंत्यसंस्काराच्या विधींमध्ये अडथळा आणल्याप्रकर्णी एका स्वयंघोषित 'अघोरी'ला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. जळत्या चितेवरून मानवी मांस खातानाचा या आरोपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. किन्नर आखाड्याची 'महामंडलेश्वर' असल्याचा दावा करणाऱ्या काली उर्फ नंद गिरी असे या आरोपीचे नाव आहे. सेनापती काल भैरव समितीने जीवाजीगंज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आलेली आहे.

उज्जैन महानगरपालिकेच्या हद्दीतील चक्रतीर्थ स्मशानभूमीत हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर समोर आला आणि पाहता पाहता तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये आरोपी हातात तलवार घेऊन जळत्या चितेजवळ उभी असलेली आणि चितेतील मांस खाताना दिसत आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्याची माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रतीक शर्मा यांनी दिली. आरोपी काली उर्फ नंद गिरी हिने स्वतःच या घटनेचा व्हिडिओ शूटिंग करून तो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केला असावा, असा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०१ (स्मशानभूमीत अनाधिकृत प्रवेश करणे व मृतदेहाचा अनादर करणे) आणि आर्म्स ॲक्टच्या कलम २५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नगर पोलीस अधीक्षक पुष्पा प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केल्यानंतर आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. दरम्यान, जुना आखाड्याचे महामंडलेश्वर शैलेशानंद गिरी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, "सभ्य समाजात अशा विकृत कृत्यांचे समर्थन केले जाऊ शकत नाही," अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.