मुंबई : रेल्वेचे तिकीट किंवा मासिक पास काढण्यासाठी दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा एकत्रित व्यवहार करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता अतिरिक्त झळ बसणार आहे. अशा प्रत्येक व्यवहारासाठी कमाल पाच रुपये व्यापारी सवलत दर आकारला जाणार आहे. त्यावर १८ टक्के वस्तू व सेवा कर लागू होणार असल्याने प्रवाशांना एकूण ५ रुपये ९० पैसे अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. हे शुल्क १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
रेल्वेच्या तिकीट खरेदीसाठी मोठ्या रकमेचा एकत्रित व्यवहार करणाऱ्या प्रवाशांवर या शुल्काचा थेट परिणाम होणार आहे. विशेषतः मासिक पास, वातानुकूलित लोकलचे तिकीट तसेच दोन किंवा अधिक प्रवाशांचे एकत्रित तिकीट काढताना व्यवहाराची रक्कम दोन हजार रुपयांपेक्षा जास्त झाल्यास अतिरिक्त ५ रुपये ९० पैसे आकारले जातील. उदाहरणार्थ, सीएसएमटी ते कल्याण वातानुकूलित लोकलचे तिकीट काढताना तिकिटाची मूळ रक्कम २,०३३ रुपये ५० पैसे असल्यास त्यावर १०१ रुपये ५० पैसे वस्तू व सेवा कर मिळून एकूण २,१३५ रुपये द्यावे लागतात.
सध्याच्या पद्धतीनुसार हा व्यवहार दोन हजार रुपयांच्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याने १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून त्यावर ५ रुपये ९० पैसे अतिरिक्त आकारले जातील. त्यामुळे प्रवाशाला एकूण २ हजार १४० रुपये ९० पैसे मोजावे लागतील. रेल्वेबरोबरच दूरसंचार, विमा, पेट्रोल-डिझेल आणि कृषी क्षेत्रासाठी आवश्यक वस्तू यांसारख्या अत्यावश्यक सेवांशी संबंधित दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांनाही हे शुल्क लागू होणार आहे.छोट्या रकमेच्या तिकिट खरेदीवर परिणाम नाही दोन हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांना या निश्चित शुल्काची मर्यादा लागू होणार नाही. त्यामुळे दररोजचे सर्वसाधारण लोकल तिकीट, कमी किमतीचे प्रवास तिकीट किंवा दोन हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचे व्यवहार करणाऱ्या प्रवाशांना या शुल्काचा फटका बसणार नाही. मात्र, मोठ्या रकमेचे तिकीट, मासिक पास किंवा एकाच वेळी अनेक प्रवाशांची तिकिटे काढणाऱ्यांना प्रत्येक पात्र व्यवहारामागे ५ रुपये ९० पैसे अतिरिक्त खर्च करावे लागतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.