सांगली :- जत तालुक्यातील बिजरगी परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात मटका साहित्य, नोंदी आणि रोख रकमेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये एका माजी नगरसेवकाचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात व स्थानिक पातळीवर प्रचंड खळबळ उडाली आहे.
जत पोलिस निरीक्षकांना बिजरगी परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या मागे बेकायदेशीर मटका अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकला.या कारवाईदरम्यान पोलिसांनी मटका चालवणारा संशयित प्रभाकर शिंदे (वय ३७, रा. तीपेहाळी) याच्यासह माजी नगरसेवक राजू यादव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी मटका जुगाराचे साहित्य, विविध नोंदींची कागदपत्रे आणि १३०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
परिसरात जोरदार चर्चा
एका लोकप्रतिनिधी राहिलेल्या माजी नगरसेवकाचे नाव मटका धंद्यात समोर आल्याने जत शहरासह तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. जत पोलिस या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.