डायबिटीज हा आजार सध्या अनेकांना सतावतो आहे. अगदी तिशी-चाळीशीतही डायबिटीजने लोक ग्रस्त आहेत. याला कारणीभूत खराब आहार, तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव असे अनेक घटक आहेत.
डायबिटीजचं निदान होताच सर्वात आधी बदल होतो तो रोजच्या आहारात. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन या सगळ्यांचा समतोल राखणारा आहार घ्यावा लागतो. शिवाय आपल्या रोजच्या आहारात आपण अगदीच साखर घेऊन खात नसलो तरी काही पदार्थांमध्ये नैसर्गिक साखर असल्याने त्यावरही नियंत्रण ठेवावं लागतं. अनेकांना चपाती, भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखं, जेवल्यासारखं वाटतच नाही. त्यामुळे अनेकदा असा प्रश्न पडतो की डायबिटीज आहे मग भात खायचा की नाही?
खरं तर तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. मात्र, भात आहारातून पूर्णपणे वगळणं खरंच गरजेचं आहे का? याबाबत सविस्तर माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेऊया…
डायबिटीज रूग्ण भात खाऊ शकतात का?
मधुमेहतज्ज्ञ डॉ. विपुल यांच्या मते, साखर वाढण्याच्या भीतीने तांदूळ पूर्णपणे सोडण्याची गरज नाही. जर तुम्हाला भात खायला आवडत असेल तर तुम्ही डायबिटीज असतानाही खाऊ शकता. मात्र खाण्याच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील.
तांदळाचे प्रमाण
डॉक्टर सांगतात की पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाताचं प्रमाण. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असल्याने जास्त भात खाल्ला तर रक्तातील साखरेची पातळी देखील वेगाने वाढू शकते. अशा परिस्थितीत तांदूळ पूर्णपणे सोडण्याची गरज नाही, फक्त त्याचं प्रमाण कमी करा. साधारण एक वाटी भात आणि भरपूर डाळ आणि भाज्या एकत्रित खा. यामुळे भात खाण्याची इच्छा शमेल आणि साखरेची पातळी फारशी वाढणार नाही.
फक्त भात खाऊ नका
भाताबरोबर तुम्ही काय खाता हेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तज्ज्ञ सांगतात की, भात कधीही नुसता खाऊ नये. त्याच्यासह भरपूर डाळ, भाज्या किंवा दही खा. भात कमी आणि डाळ जास्त, भाजी जास्त प्रमाणात खा.
कूलिंग ट्रिकचा वापर
तज्ज्ञांच्या मते, डायबिटीजमध्ये ताज्या तयार केलेल्या भाताऐवजी शिळा भात खाणे अधिक फायदेशीर आहे. शिळ्या भातामध्ये प्रतिरोधक स्टार्चचे प्रमाण वाढते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी तितक्या वेगाने वाढत नाही. यासाठी तुम्ही एक दिवस आधी भात बनवून फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा गरम करून खाऊ शकता.
खाण्याचा क्रम बदला
तज्ज्ञ अनेकदा खाण्याचा क्रम बदलण्याचा सल्ला देतात. सर्वात आधी कोशिंबीर खा, मग कडधान्य भाजी, पनीर, राजमा किंवा अंडी यासारखे प्रोटीनयुक्त पदार्थ खा. त्यानंतर डाळ, भात वगैरे खा.
छोटीशी सवय फायदेशीर ठरेल
आहारातील वदलाव्यतिरिक्त आणखी एक सवय रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकते. जेवल्यानंतर १० ते १५ मिनिटं चालल्यास यामुळे साखरेचे प्रमाण कमी होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.