शासकीय अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ अन जीवे मारण्याची धमकी; मिरजेत विनायक जाधवांच्या गुंडगिरीविरुद्ध 'आम्ही आंबेडकरवादी संघटना' आक्रमक!
जिल्हा परिषदेवर धडक; सीईओंना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी; आंदोलनाचा इशारा
मिरज :- शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला थेट फोनवरून अश्लील, जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मिरज पंचायत समितीत समोर आला आहे. मिरज पंचायत समितीचे सदस्य विनायक जाधव यांनी विस्तार अधिकारी (पंचायत) शिवानंद कोळी यांना ही धमकी दिल्याची घटना घडली असून, याप्रकरणी ‘आम्ही आंबेडकरवादी संघटना’ आक्रमक झाली आहे. या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित सदस्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) निवेदन देण्यात आले.
अर्जाची मागणी केली अन् शिवीगाळ सुरू झाली!
मिळालेल्या माहितीनुसार, शिवानंद कोळी हे मिरज पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी (पंचायत) म्हणून निष्ठापूर्वक कार्यरत आहेत. त्यांच्याकडे कसबे डिग्रज बीटमधील कसबे डिग्रज, पद्माळे तसेच इतर ग्रामपंचायतींचे कामकाज असून, ते कसबे डिग्रज प्रभागाचे सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. पंचायत समिती सदस्य विनायक जाधव यांच्या प्रभागातील एका विकासकामासंदर्भात कोळी यांच्याशी चर्चा सुरू होती. सदर कामासाठी शासकीय नियमावलीनुसार औपचारिक अर्ज करण्याची विनंती कोळी यांनी जाधव यांना केली. मात्र, केवळ नियमाचे बोट दाखवून अर्ज मागितल्याचा राग अनावर झाल्याने, सदस्य विनायक जाधव यांनी फोनवरून विस्तार अधिकारी कोळी यांना अश्लील शब्दांत अपशब्द वापरले, जातीवाचक शिवीगाळ केली आणि थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह; अधिकाऱ्याचे मानसिक खच्चीकरण
प्रामाणिकपणे शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकाऱ्याला जर लोकप्रतिनिधीकडूनच अशा प्रकारे दबाव, अश्लील शिवीगाळ आणि धमक्यांचा सामना करावा लागत असेल, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रशासकीय कारभारावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींच्या या मुजोरीमुळे विस्तार अधिकारी शिवानंद कोळी यांचे तीव्र मानसिक खच्चीकरण झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
शासकीय कर्मचाऱ्यांवरील हा अन्याय सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका 'आम्ही आंबेडकरवादी संघटनेने' घेतली आहे. या प्रकरणाची सखोल आणि तातडीने चौकशी करून दोषी पंचायत समिती सदस्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. जर प्रशासनाने यावर तत्काळ ठोस पाऊल उचलले नाही, तर जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. तसेच आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाचीच राहील, असा थेट इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.