ईश्वरपूर :- चालू गळीत हंगामाच्या तोंडावर वाळवा तालुक्यात ऊस दराचा भडका उडाला आहे. उसाला प्रतिटन ५,००० रुपये पहिली उचल (First Advance) मिळाल्याशिवाय एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही, अशी कठोर भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची पहिली ठिणगी पाडली आहे. ईश्वरपूर येथील वाघवाडी फाटा परिसरात एन. डी. शुगर (शकुंतलानगर) कारखान्याकडे ऊस वाहून नेणारे ट्रॅक्टर अडवून कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
ट्रॅक्टर रोखले, टायरमधील हवा सोडली
वाघवाडी फाट्यावर जमा झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखान्याकडे चाललेले ५ ते ६ उसाचे ट्रॅक्टर रोखून धरले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी काही ट्रॅक्टरच्या टायरमधील हवा सोडून दिली आणि ऊस वाहतूक पूर्णपणे ठप्प केली. "शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळालाच पाहिजे," अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर हादरून गेला होता. या प्रकारामुळे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
साखरेचे भाव गगनाला, मग शेतकऱ्यांना दर का नाही?
सध्या बाजारात साखरेचे दर प्रतिक्विंटल ५,००० ते ५,५०० रुपयांच्या पार गेले आहेत, तर सामान्य जनतेला ६० ते ६५ रुपये किलोने साखर खरेदी करावी लागत आहे. साखरेचे भाव उच्चांकी असताना आणि उसाच्या उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली असताना साखर कारखानदार मात्र दरावर मौन बाळगून आहेत, असा आरोप संघटनेने केला आहे."उसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. साखरेचे भाव गगनाला भिडले असताना कारखानदार शेतकऱ्यांना त्यांचा हक्क देण्यास टाळाटाळ करत आहेत. ५,००० रुपये पहिली उचल मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण तालुक्यात आंदोलन अधिक तीव्र करू!"— स्वाभिमानी शेतकरी संघटना
गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच ऊस दर ऐरणीवर
वाळवा तालुक्यातील या पहिल्याच आंदोलनामुळे चालू गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच ऊस दराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्वाभिमानीच्या या आक्रमक पवित्र्यामुळे साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील संघर्ष येत्या दिवसांत अधिक पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.