गुजरातमधील सुरतच्या प्रसिद्ध श्याम संगिनी कापड बाजारपेठेमध्ये लागलेल्या भीषण आगीप्रकरणी पोलिसांनी एका माजी लेखापालाला अटक केली आहे. विनोद साळवे असे आरोपीचे नाव असून, थकीत १० हजार रुपयांच्या पगारावरून झालेल्या वादातून मालकाला धडा शिकवण्यासाठी त्याने बाजारपेठेमध्ये आग लावल्याचा पोलिसांचा दावा आहे. या आगीत कापड व्यापाऱ्यांचे तब्बल २४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
सीसीटीव्हीत कैद झाला आगीचा थरार
आगीच्या दुर्घटनेपूर्वीचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. यामध्ये काळ्या रंगाचा शर्ट-पँट परिधान केलेली आणि पाठीवर बॅग असलेली एक संशयित व्यक्ती बाजारपेठेच्या कॉरिडॉरमधून जाताना दिसत आहे. काही वेळानंतर, तो आपल्या बॅगेतून काहीतरी बाहेर काढून दुकानाबाहेर ठेवलेल्या कापडाच्या पार्सलवर शिंपडताना दिसून येतो. यानंतर, माचीसच्या काडीने त्या पार्सलला आग लावून तो घटनास्थळावरून पसार होतो. संबंधित व्यक्तीने आपला चेहरा कापडाने झाकला असून डोळ्यांवर काळा चष्मा घातल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
कंपनी मालक आणि वरिष्ठ लेखापालामुळे त्रस्त
पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या विनोद साळवेने एप्रिल २०२६ मध्ये श्याम संगिनी बाजारपेठेमधील एका कापड व्यापाऱ्याकडे लेखापाल म्हणून नोकरी स्वीकारली होती. त्याला महिन्याला ३० हजार रुपये पगार मिळत होता. मात्र, वरिष्ठ लेखापाल आणि कंपनीचा मालक वारंवार आपल्याला ओरडत आणि कामातील चुका काढत असल्याने आपण त्रस्त झालो होतो, असे साळवेने पोलिसांना सांगितल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. सुमारे महिनाभरापूर्वी त्याने नोकरी सोडली होती. त्यावेळी त्याचे १० हजार रुपये पगार थकीत होते. हे पैसे मिळवण्यासाठी तो कार्यालयात फोन करत होता किंवा अधूनमधून तेथे जात होता. मात्र, पैसे देण्यास सतत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्याने केला आहे.
‘धडा शिकवण्यासाठी’ आग लावल्याचा आरोप
पैसे मिळत नसल्याने संतप्त झालेल्या साळवेने माजी मालकाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दुकानाबाहेर डिलिव्हरीसाठी ठेवलेल्या साड्या आणि ड्रेस मटेरियलच्या पार्सलला आग लावून व्यापाऱ्यांचे नुकसान करण्याची योजना त्याने आखल्याचा आरोप आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या आदल्या दिवशी त्याने डिंडोली येथील पेट्रोल पंपावरून दीडशे रुपयांचे पेट्रोल खरेदी केले. त्यानंतर रात्री बाजारामधील सर्व दुकाने बंद झाल्यानंतर तो सहाव्या मजल्यावर गेला आणि कॉरिडॉरमध्ये ठेवलेल्या कापडाच्या पार्सलवर पेट्रोल टाकून आग लावल्याचे पोलिसांनी सांगितले.
चार मिनिटांत आग लावून फरार
सीसीटीव्हीच्या तारीख आणि वेळेनुसार साळवे बाजारपेठेमध्ये अवघ्या चार मिनिटांसाठी होता. आग लावल्यानंतर तो दुचाकीवरून फरार झाला. त्यानंतर तो राजस्थान आणि अयोध्येला गेल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी रात्री तो पुन्हा सुरतला परतला. त्याच्या परतण्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी डिंडोली परिसरातून त्याला ताब्यात घेतले.
सुरत कापड बाजार आग प्रकरणी आरोपी विनोद साळवे
१४ तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आगीची माहिती मध्यरात्री सुमारे पावणेबारा वाजता अग्निशमन विभागाला मिळाली. अग्निशमन दलाच्या पथकांनी तब्बल १४ तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणली. सहाव्या मजल्यावरील सर्व दुकाने आगीत जळून खाक झाली, तर पाचव्या मजल्यावरील काही दुकानांनाही आगीची झळ बसली.दरम्यान, पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरोधात जाळपोळीचा गुन्हा दाखल केला होता. सीसीटीव्ही आणि इतर तपासाच्या आधारे साळवेची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.