"न्यायपीठावरच अन्याय!" ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांचा पुरुष न्यायाधीशावर लैंगिक शोषणाचा खळबळजनक दावा
जेष्ठ वकील इंदिरा जयसिंग या कायम कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. इंदिरा जयसिंग यांच्यावर अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे टीका देखील झालेली आहे आणि सोशल मीडियावर त्यांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे.
आता ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी पुन्हा एकदा केलेल्या एका दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
'महिला न्यायाधीशांनी पुरुष न्यायाधीशांकडून लैंगिक शोषण झाल्याची तक्रार केली आहे', असा धक्कादायक दावा इंदिरा जयसिंग यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला आहे. अनेक महिला न्यायाधीशांनी पुरुष न्यायाधीशांकडून होणाऱ्या लैंगिक छळाबाबत त्यांच्याकडे तक्रार केली असल्याचं इंदिरा जयसिंग यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त 'लाईव्ह लॉ'ने दिलं आहे.
दरम्यान, भारतीय न्यायव्यवस्था ही जगातील सर्वात मजबूत आणि सुरक्षित न्यायव्यवस्थांपैकी एक मानली जाते. मात्र, इंदिरा जयसिंग यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. इंदिरा जयसिंग यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, इंदिरा जयसिंग यांनी केलेलं वक्तव्य फक्त दावा असून त्याबाबत अद्याप अधिकृत तक्रार कुठे दाखल झाली आहे? हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
इंदिरा जयसिंग यांनी काय म्हटलं?
इंदिरा जयसिंग यांनी सांगितलं की, काही महिला न्यायाधीशांनी पुरुष न्यायाधीशांकडून होणाऱ्या लैंगिक छळाबाबत आपल्याला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 'माझ्या अनुभवात मला अनेक महिला न्यायाधीशांशी कामं करावं लागलं आहे. मी अनेक महिला न्यायाधीशांचं प्रतिनिधित्व केलं आहे. या महिला न्यायाधीश माझ्याकडे पुरुष न्यायाधीशांकडून होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारी घेऊन आल्या होत्या. त्यामुळे मी माझ्या पुस्तकातही लिहिलं आहे की, लैंगिक छळ हे भारतीय न्यायव्यवस्थेचे एक 'डर्टी सिक्रेट' आहे. याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही', असं इंदिरा जयसिंग यांनी २९ व्या डी.एस.बोरकर स्मृती व्याख्यानमालेत बोलताना म्हटल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
'न्यायव्यवस्थेतील श्रेणीबद्ध रचनेमुळे लैंगिक छळाच्या अशा घटना घडतात', असा दावाही जयसिंग यांनी केला. लैंगिक छळाचा सामना करणाऱ्या एका महिला न्यायाधीशाचं प्रतिनिधित्व करतानाचा त्यांना आलेला अनुभव सांगताना इंदिरा जयसिंग यांनी सांगितलं की, 'मी ज्या महिला न्यायाधीशाचं प्रतिनिधित्व करत होते, त्यांनी मला सांगितलं की, तिला स्वतःला एका न्यायाधीशाकडून लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता. त्या न्यायाधीशाने तिला 'माझ्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या पार्टीला ये आणि एका 'आयटम नंबर'वर डान्स कर' अशी टिप्पणी केली होती. या महिला न्यायाधीशाने विरोध केला आणि परिणामी तिला तिची नोकरी गमवावी लागली', असा दावा इंदिरा जयसिंग यांनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.