शिराळा : एकीकडे देश डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे राज्यातील भूमी अभिलेख कार्यालयात मात्र अत्यंत अजब आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. मयत व्यक्तीच्या वारसांची नोंद करण्यासाठी चक्क “मयत व्यक्तीच्याच” नावाने टपालाने नोटीस पाठवून त्याच्या मृत्यूची खात्री पटवली जात आहे.
प्रशासनाच्या या अजब आणि जुनाट कारभारामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून, या ‘सरकारी सावळागोंधळावर’ तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारस नोंदीसाठी अर्जदारांकडून अधिकृत मृत्यू दाखला, वारस प्रमाणपत्र, शपथपत्र यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे जमा करून घेतली जातात. तरीही अशा प्रकारे मयत व्यक्तीला पत्र पाठवून वेळकाढूपणा का केला जातो, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या अनावश्यक प्रक्रियेमुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक आरोग्य तिन्ही वाया जात आहे. डिजिटल युगातही अशी थट्टा करणारी जुनाट पद्धत सुरू असणे हे प्रशासकीय अनास्थेचे लक्षण आहे. महसूल विभागाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून या अजब प्रक्रियेला पूर्णविराम द्यावा आणि पारदर्शक व सुलभ मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी होत आहे.
अशी चालते ही अजब प्रक्रिया
नातेवाईकांना नोटीस: वारस नोंदीचा अर्ज आल्यानंतर नियमानुसार नातेवाईकांना नोटीस बजावली जाते.
मयतालाच पत्र: मयत व्यक्ती खरोखरच हयात नाही ना, हे तपासण्यासाठी मृत व्यक्तीच्या नावानेच त्याच्या जुन्या पत्त्यावर पत्र धाडले जाते.
शेऱ्यावरून खात्री: टपाल खात्याकडून “संबंधित व्यक्ती मयत आहे अथवा पत्ता सापडत नाही” असा शेरा मारून पत्र परत आले, की मगच व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे भूमी अभिलेख कार्यालय मान्य करते.नागरिकांना मनस्ताप: पोस्टाचे हे पत्र परत येईपर्यंत वारसांना अर्जाच्या मंजुरीसाठी कार्यालयाचे वारंवार हेलपाटे मारावे लागतात.भूमी अभिलेख कार्यालयात मयत व्यक्तीच्या नावे मालमत्ता असते त्यामुळे मयत व्यक्तीच्या नावे नोटीस बजावण्यात येते.सदर पाठवलेली नोटीस सदर व्यक्ती मयत आहे अगर सदर व्यक्ती नाही असा शेरा मारून परत नोटीस येते.त्यामुळे सदर मालमत्तेवर वारसांची नोंद करण्यात येते. - सुजाता माळी, उप अधीक्षक भूमि अभिलेख शिराळाआम्ही मयत व्यक्तीचा अधिकृत नगरपरिषदेचा दाखला दिला तसेच वारस नोंदणी साठी अधिकृत वारस दाखला दिला.तरीही मयत व्यक्तीच्या नावे भूमी अभिलेख कार्यालयामार्फत नोटीस बजावण्यात आली होती.शासकीय कार्यालयाचा मृत्यू दाखला या कार्यालयाने ग्राह्य धरावा.यामुळे नागरिकांचा वेळ पैसा वाचेल. - कुमार पारेख, नागरिक
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.