मिरज :- सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरील कमान कोसळून ९ निष्पाप नागरिक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडूनही, सांगली जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन गप्प बसल्याने मिरजकरांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. एवढा मोठा भीषण अपघात झाला असताना, राज्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि स्थानिक आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून साधी सहानभूतीची प्रतिक्रियाही न आल्याने "या गुप्पी-चुप्पीमागे नेमकं काळं-बेरं काय?" असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.
९ जण गंभीर जखमी, तरीही प्रशासन सुस्त!
स्थानिक नागरिकांच्या आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात घडलेल्या या घटनेत तब्बल ९ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सिव्हिल हॉस्पिटलसारख्या गजबजलेल्या आणि संवेदनशील ठिकाणी ही कमान कशी कोसळली? बांधकामाचा दर्जा इतका निकृष्ट कसा होता? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न?
एकीकडे नागरिक आणि रुग्णांचे नातेवाईक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना, दुसरीकडे मात्र या कमानीचे काम करणाऱ्या ठेकेदाराला अभय दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे. दुर्घटनेला अनेक तास उलटूनही निष्काळजी ठेकेदारावर अथवा संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. लोकप्रतिनिधींच्या या गूढ मौनामुळे 'ठेकेदार नामा निराळा आणि जनता वाऱ्यावर' अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
नागरिकांचा एल्गार: दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करा!
पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांच्या या दुर्लक्षामुळे जनतेमध्ये संतापाचा उद्रेक होत आहे. केवळ घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडणारे नेते अशा जीवघेण्या अपघातावर एक 'ब्र' शब्दही काढायला तयार नाहीत.मिरजकर नागरिकांनी आता या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून, खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा किंवा गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत.जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च प्रशासनाने करावा आणि त्यांना योग्य ती भरपाई द्यावी.सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील इतर सर्व बांधकामांचे तत्काळ 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्यात यावे.प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी जर यावर अजूनही मौन बाळगले, तर मिरजेची जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा सज्जड इशारा स्थानिकांनी दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.