मुंबई: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाची (एफडीए) धुरा हाती घेतल्यानंतर राज्यात धडक कारवाई सुरू झाली आहे. एफडीएच्या कारवाईने भेसळखोरांचे धाबे दणाणले असून अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मुंबईत एफडीएने केलेल्या कारवाईत नामांकित कॅफे, रेस्टोरंट्स अडकले आहेत. मुंबईतील १२२ वर्ष जुनं असलेल्या 'क्यानी' वर एफडीएने कारवाई केली आहे.
मुंबईतील अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उपाहारगृहांविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील १२२ वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या प्रसिद्ध 'क्यानी अँड कंपनी' (Kyani & Co.) या इराणी कॅफेसह शहरातील तब्बल १३ प्रमुख खाद्य आस्थापनांचे अन्न परवाने (FSSAI Licence) एका झटक्यात निलंबित करण्यात आले आहेत.
'क्यानी कॅफे'च्या किचनमध्ये किळसवाणा प्रकार
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता १२२ वर्षे जुन्या क्यानी कॅफेच्या स्वयंपाकघरात आणि अन्न साठवणुकीच्या जागेत मांजरी, उंदरांची विष्ठा, जिवंत माश्या आणि मृत झुरळे आढळून आले. इतकेच नव्हे तर, तेथील फ्रिजमध्ये रक्त साचलेले होते, तर अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या मध्योमध्य मॅनहोलचे उघडे गटार होते. अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवले जात होते आणि मळलेले पीठ छापील वर्तमानपत्राने झाकले होते. तसेच शिजवलेले आणि कच्चे अन्न वेगळे न ठेवता एकत्रच ठेवल्याचे निदर्शनास आले.
सबवे, कुलाबा स्वीट्ससह इतर ठिकाणी कारवाई...
लोअर परेल येथील 'सबवे' येथे बुरशी आलेला आणि दुर्गंधीयुक्त खराब फ्रिज, जिवंत झुरळे, पाण्याचा साचलेला साठा आढळून आला. अन्न काउंटरखाली वापरलेले बूट-चप्पल ठेवले होते, तर कामगाराच्या घामट-अस्वच्छ जॅकेटचा थेट स्पर्श कांदे व इतर अन्नपदार्थांना होत होता.
कुलाब्यातील 'कुलाबा स्वीट्स मार्ट'च्या वजन काट्यावर आणि पॅकेजिंगच्या साहित्यावर जिवंत झुरळे आढळली. तसेच अन्न बनवण्याच्या जागेत पाल, माश्या आणि अळ्यांचा सुळसुळाट दिसून आल्याची माहिती एफडीए अधिकाऱ्यांनी दिली. मॉपच्या अस्वच्छ पाण्याजवळ उघडे अन्न आणि वर्तमानपत्रावर मळलेले पीठ ठेवले असल्याचे आढळून आले.विलेपार्ले पूर्व येथील 'डॅफोडिल्स फास्ट फूड इन' येथे प्रचंड धूळ आणि घाण साचली होती, फ्रीजचे तापमान दाखवणारे डिस्प्ले बंद होते. साठवणुकीच्या जागेतच कामगार झोपलेले आढळले असून त्यांचे वैयक्तिक साहित्य अन्नाजवळच ठेवले होते.
धारावीमधील 'अरुण विलास फरसाण' येथे झुरळे, किडे आणि उंदीर आढळून आले. उंदरांनी खराब केलेले अन्नपदार्थ, कोळ्याची जाळी आणि अस्वच्छता यामुळे यावर कारवाई झाली. त्याशिवाय, परळमधील 'रुची व्हेज रेस्टॉरंट', 'क्यूएसआर ब्रँड्स इंडिया', सांताक्रूझचे 'युनायटेड बेकरी अँड स्टोअर्स', जोगेश्वरीचे 'श्री पद्मावती एंटरप्रायझेस', खारचे 'हॉटेल पुरंदर विलास', फोर्ट येथील 'रॉयल चायना' आणि वांद्रे येथील 'टिफिन' या हॉटेल्सचे परवानेही अस्वच्छतेमुळे निलंबित करण्यात आले.
११.८१ लाखांचे पामोलिन तेल जप्त
दुसऱ्या एका कारवाईत, एफडीएने जोगेश्वरी येथून साठवणूक आणि गुणवत्तेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७,३४० किलो पामोलिन तेल जप्त केले. या जप्त केलेल्या तेलाची एकूण किंमत ११.८१ लाख रुपये आहे. खाद्यतेल पॅक करण्यासाठी वापरलेल्या आणि जुन्या डब्यांचा गैरवापर केला जात असल्याचे तपासणीत उघडकीस आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.