मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यात मोठ्या कारवाया सुरू आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत.
दरम्यान, आता तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. विविध जिल्ह्यांतील 12 उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर, गैरवर्तन आणि कोर्टाची दिशाभूल केल्याचा गंभीर ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे. तुकाराम मुंढे यांनी या सर्व अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आणि विभागीय चौकशीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केल्याने प्रशासकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.
नाशिक येथील M/s. High Street Impex LLP आणि M/s SOEX India Pvt. Ltd. या कंपन्यांवर केलेल्या कारवाईदरम्यान एफडीएच्या पाच अधिकाऱ्यांवर अत्यंत गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत त्यांची चौकशी सुरू झाली आहे. जप्त करण्यात आलेली मानवी आरोग्यास असुरक्षित असलेली सुपारी प्रत्यक्ष नष्ट न करता केवळ कागदोपत्री ती नष्ट केल्याची खोटी कार्यवाही दाखवण्यात आली. या खोट्या दस्तऐवजांच्या आधारे न्यायालयाची थेट दिशाभूल करून आदेशांचा अवमान केल्याचा आणि गंभीर भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. .
अधिकाऱ्यांवर कोणते गंभीर आरोप?
न्यायालयाचा अवमान व बनावट कागदपत्रे: जप्त असुरक्षित सुपारी प्रत्यक्षात नष्ट न करता खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयात सादर केले.
कर्तव्यात कसूर व अक्षम्य दुर्लक्ष: जबाबदारी पार न पाडता अत्यंत संवेदनशील प्रकरणांत हलगर्जीपणा दाखवला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रतिसाद न देणे: आयुक्तांच्या व वरिष्ठांच्या सूचनांचे उल्लंघन करणे आणि बैठकांना/कारवाईला प्रतिसाद न देणे.
गैरवर्तन व अनुपस्थिती: विनापरवानगी कर्तव्यावर गैरहजर राहणे व प्रशासकीय शिस्तीचा भंग करणे.
शिस्तभंगाची कडक कारवाई
या प्रकरणी सर्व दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 'महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 ' च्या नियम 8 अंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यासोबतच त्यांच्या तात्काळ निलंबनाचा आणि सखोल विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यातील अधिकारी?
एफडीए आयुक्तांच्या या 'सर्जिकल स्ट्राइक'मध्ये राज्यातील विविध महत्त्वाच्या विभागांतील अधिकारी रडारवर आले आहेत. मुंबई, पुणे, नाशिकमधील 5 अधिकारी, नागपूर, सोलापूर, अकोला आणि बुलढाणा येथील अधिकारी आहेत.
एफडीएच्या अंतर्गत साफसफाईला वेग
तुकाराम मुंढे यांनी एफडीए आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईमुळे एफडीएमधील अंतर्गत गैरप्रकारांना चाप बसणार असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जरब बसणार असल्याचे चित्र आहे. आता या 12 अधिकाऱ्यांव काय अंतिम कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.