सांगली : सांगलीतील विजयनगर परिसरात पतीच्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला तसेच अमानुष माहाणीला कंटाळून २५ वर्षीय नवविवाहितेने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना शनिवार, दि. ३ रोजी सकाळी उघडकीस आली.
संजीवनी मल्हारी कांबळे (वय २६, रा. बेथेल चर्चजवळ, विजयनगर, सांगली) असे मृत विवाहितेचे नाव आहे. त्या विश्रामबाग येथील महावितरण कार्यालयात सेवेत होत्या. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ लातूर येथील असलेल्या संजीवनी (माहेरचे नाव संजीवनी बालाजी फुले) यांनी दोन वर्षांपूर्वी महावितरणची खासगी कंत्राटी कामे करणाऱ्या मल्हारी कांबळे याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच कौटुंबिक व किरकोळ कारणांवरून पतीने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर दररोजच्या मारहाणीत होऊ लागले होते.पतीकडून होणारा हा अमानुष छळ असह्य झाल्याने अखेर संजीवनी यांनी शनिवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेतला. घटनेनंतर पती मल्हारी याने त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनादरम्यान संजीवनी यांच्या अंगावर मारहाणीचे गंभीर व्रण आढळून आले. पतीच्या अमानुष मारहाणीला आणि छळाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.