🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नुकसानभरपाईचा दणका! सिनेमा हॉलमधील अति-जाहिरातींविरुद्ध ग्राहकाचा एल्गार; जाणून घ्या तुमच्या हक्कांचा ‘हा’ पॉवरफुल कायदा

नुकसानभरपाईचा दणका! सिनेमा हॉलमधील अति-जाहिरातींविरुद्ध ग्राहकाचा एल्गार; जाणून घ्या तुमच्या हक्कांचा ‘हा’ पॉवरफुल कायदा


आपण चित्रपटाचे तिकीट काढतो, वेळेवर थिएटरमध्ये पोचतो आणि ठरलेल्या वेळी चित्रपट सुरू होईल अशी अपेक्षा ठेवतो. प्रत्यक्षात मात्र आधी जाहिरातींचा मोठा भडिमार सुरू होतो. दोन-चार जाहिराती असतील तर आपण फारसा विचार करत नाही. पण, त्या वाढत जातात आणि चित्रपट सुरू व्हायला बराच उशीर होतो, तेव्हा मनात प्रश्न येतोच तिकीट आपण चित्रपटासाठी घेतलं आहे की जाहिराती पाहण्यासाठी? हाच प्रश्न बंगळुरूमधील एका वकिलाने विचारला. 
२६ डिसेंबर २०२३ रोजी त्यांनी बंगळुरूमधील एका मल्टिप्लेक्समध्ये 'सॅम बहादूर' चित्रपटाचे तिकीट बुक केले होते. पण, मोठ्या प्रमाणात व्यावसायिक जाहिराती दाखवल्या गेल्यामुळे चित्रपट उशिरा सुरू झाला. अशा वेळी अनेक जण नाराज होतात. काही जण बाहेर येऊन कर्मचाऱ्यांकडे तक्रार करतात आणि मग विषय तिथेच संपतो. या ग्राहकाने मात्र तो तिथेच संपू दिला नाही.

मोठी नुकसानभरपाई

या व्यक्तीने हे प्रकरण ग्राहक आयोगापर्यंत गेले. आयोगाने ग्राहकाच्या बाजूने निर्णय दिला आणि संबंधित थिएटर कंपनीला २० हजार रुपये नुकसानभरपाई व आठ हजार रुपये कायदेशीर खर्च देण्याचे आदेश दिले. शिवाय एक लाख रुपये ग्राहक कल्याण निधीमध्ये जमा करण्याचेही निर्देश दिले. पण या प्रकरणाकडे एका ग्राहकाला २० हजार रुपये मिळाले एवढ्यापुरते पाहणे मला योग्य वाटत नाही. 
रोजच्या आयुष्यात आपण अशा कितीतरी गोष्टी सहज स्वीकारतो. थिएटरमध्ये जाहिराती लागतात, चित्रपट उशिरा सुरू होतो, ठीक आहे. रेल्वे किंवा बस उशिरा येते, ठीक आहे. एखाद्या सेवेसाठी तासनतास थांबावे लागते, तरी ठीक आहे. आपण स्वतःलाच समजावतो, सगळ्यांसोबतच तर होत आहे. पण एखादी गोष्ट नेहमी घडते म्हणून ती योग्य ठरत नाही. 
या व्यक्तीने सगळेच सहन करतात म्हणून विषय सोडून दिला नाही. त्याने प्रश्न विचारला. कायदेशीर मार्ग वापरला. आणि संबंधित संस्थेला त्या प्रश्नाची दखल घ्यावी लागली. मात्र, इथे थांबून एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य करायला हवी. कायदा नेहमी काम करतो असे म्हणणे खरे ठरणार नाही. आपल्या आजूबाजूला रोजगार, वेतन, घर, कुटुंब किंवा नुकसान भरपाईसाठी वर्षानुवर्षे कायदेशीर लढाई लढणारे अनेक लोक आहेत. काहींना अपेक्षित निकाल मिळत नाही, तर काहींना न्याय मिळेपर्यंत खूप वेळ वाट पाहावी लागते. म्हणूनच या घटनेकडे थोडे वेगळ्या 'नजरेने' पाहायला हवे.

ग्राहक संरक्षण
कायद्याची खरी ताकद फक्त मोठ्या प्रकरणांत दिसत नाही. एखाद्या सामान्य माणसाची छोटीशी तक्रारही जेव्हा ऐकली जाते, तेव्हाही ती दिसते. आज लाखो लोक थिएटरमध्ये जाहिराती पाहतात. बहुतेक जण त्याला मनोरंजनाचा भाग किंवा अपरिहार्य गोष्ट समजून पुढे जातात. पण, एका ग्राहकाने त्याच गोष्टीकडे माझ्या वेळेचे काय? या प्रश्नातून पाहिले. आणि कदाचित इथेच ग्राहक संरक्षणाचा खरा अर्थ उमगतो. ग्राहक म्हणजे फक्त बिल भरून वस्तू किंवा सेवा घेणारा माणूस नाही. आपल्या पैशाच्या बदल्यात योग्य सेवा मिळायला हवी, अशी अपेक्षा ठेवणारी ती व्यक्ती असते. त्या सेवेत त्रुटी वाटली, तर आवाज उठवण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे.
​अति-जाहिरातींविरुद्ध तुमचे कायदेशीर अधिकार आणि महत्त्वाच्या गोष्टी:

​वेळेचे पालन हा ग्राहकाचा अधिकार: तिकिटावर नमूद केलेल्या वेळेतच मुख्य चित्रपट सुरू होणे अपेक्षित असते. जाहिरातींचा खेळ दाखवून प्रेक्षकांचा वेळ लुटणे हा अनुचित व्यापार व्यवहार (Unfair Trade Practice) ठरतो.

​नुकसानभरपाईचा हक्क: जर थिएटर प्रशासनाने ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ जाहिराती दाखवून चित्रपट उशिरा सुरू केला, तर तुम्ही मानसिक त्रास आणि वेळेच्या अपव्ययापोटी नुकसानभरपाईची मागणी करू शकता.

​तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया:
​प्रथम थिएटर मॅनेजरकडे लेखी स्वरूपात किंवा त्यांच्या तक्रार पुस्तिकेत (Complaint Book) नोंद करा.
​तिकिटाचा फोटो, शोची वेळ आणि जाहिरातींमुळे झालेल्या विलंबाची नोंद (वेळ/व्हिडिओ) पुराव्यादाखल जपून ठेवा.

​राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) नंबर 1915 वर कॉल करा किंवा consumerhelpline.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवा.

​सुनावणी न झाल्यास तुम्ही जिल्हा ग्राहक आयोगामध्ये (District Consumer Commission) दाद मागू शकता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.