मिरज : माधवनगर येथील कापड व्यापाऱ्याची गुजरातमधील पिता-पुत्र व सून अशा तिघांनी १ कोटी २३ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केली. कापड खरेदी केलेल्या थकीत बिलाची मागणी केल्यानंतर पैसे देण्यास त्यांनी नकार दिला.
खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची व पैसे मागितल्यास ‘गेम’ करण्याची धमकी दिल्याबद्दल कापड व्यापारी नरेंद्र रामनिवास बजाज (वय ४९, रा. विद्यानगर, मिरज) यांनी गांधी चौक पोलिसांत तक्रार दिली आहे. नरेंद्र बजाज यांचा माधवनगर येथे ‘गोपाल ट्रेडर्स’ या नावाने कापड व्यवसाय आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील सारंगपूर, न्यू क्लॉथ मार्केट परिसरातील कुणाल अनिलकुमार गुप्ता, निलम कुणाल गुप्ता व अनिलकुमार गिरिराज गुप्ता यांनी २०२२ मध्ये बजाज यांच्याकडून कॉटन शर्टींग खरेदी करून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर परदेशी कापड निर्यातीची ऑर्डर मिळाल्याच्या भुलथापा देऊन बजाज यांच्याकडून उधारीवर शर्टिंग खरेदी केले. मार्च २०२६ पर्यंत बजाज यांच्याकडून १ कोटी ९८ लाख ५१ हजार रुपये किमतीचे शर्टींग खरेदी केले. त्यापैकी ७४ लाख ७८ हजार रुपये बिलाची रक्कम दिली; मात्र उर्वरित १ कोटी २३ लाख ७२ हजार रुपये दिले नाहीत. बजाज यांनी या थकीत रकमेची मागणी केली असता, पैसे मिळणार नाहीत, पैशासाठी तगादा लावल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी तिघांनी दिली. मिरजेत विद्यानगर येथील बजाज यांच्या कार्यालयात येऊन पैसे मागितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे धमकावल्याची तक्रार आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीची तक्रार झाल्यानंतर गुप्ता पिता-पुत्रांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली मात्र कोल्हापूर उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.