🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंगळवेढ्यातून नवविवाहितेचे भरदिवसा घरातून अपहरण; कर्नाटकात थरारक थरार, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल!

मंगळवेढ्यातून नवविवाहितेचे भरदिवसा घरातून अपहरण; कर्नाटकात थरारक थरार, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल!


"नांदायला का येत नाहीस?" असा जाब विचारत अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या २७ वर्षीय नवविवाहितेचे माहेरून भरदिवसा जबरदस्तीने चारचाकी गाडीतून अपहरण केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील मानेवाडी येथे घडली आहे.

तरुणीला कर्नाटकातील एका शेतात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली असून, या प्रकरणी पीडितेचा पती, दीर यांच्यासह चौघांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​दत्तात्रय पोपट माने (पती, रा. हंगिरगे, ता. सांगोला), दिलीप पोपट माने (दीर), अजित माने आणि संतोष अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मनिषा रावसाहेब घुटूकडे (वय २७ वर्षे, रा. मानेवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

​लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांत वाद

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वी सांगोला तालुक्यातील हंगिरगे येथील दत्तात्रय माने याच्याशी झाला होता. मात्र, संसार सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाले. त्यानंतर मनिषा या माहेरी मानेवाडी येथे परतल्या आणि तेव्हापासून त्या माहेरीच राहत होत्या.


हात-पाय धरून जबरदस्तीने गाडीत कोंबले

दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मनिषा यांच्या आई-वडील शेतात कामासाठी गेले होते. मनिषा घरात एकट्याच असताना अचानक घराबाहेर चारचाकी गाडीचा आवाज आला. त्या बाहेर आल्या असता पती दत्तात्रय व दीर दिलीप गाडीतून उतरले. त्यांनी "आई-वडील कुठे आहेत?" अशी विचारणा केली.

मनिषा काही समजण्याच्या आतच पतीने त्यांचे तोंड दाबून हात पकडले, तर दीराने पाय धरून त्यांना उचलले आणि एम.एच. ४५ डी. ४३५४ या क्रमांकाच्या वाहनात जबरदस्तीने कोंबले. मनिषा यांनी आरडाओरडा करू नये म्हणून धावत्या गाडीतही त्यांचे तोंड दाबून ठेवण्यात आले होते.

​कर्नाटकातील शेड मध्ये डांबून मारहाण

आरोपींनी गाडी घेरडी रस्त्याने आडवळणाने नेत कर्नाटक हद्दीतील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये नेली. तिथे खोलीत नेऊन पतीने, "तू माझ्यासोबत असं का केलंस? नांदायला का येत नाहीस? तू दुसरं लग्न कसं करतेस तेच बघतो," अशी धमकी देत शिवीगाळ केली आणि बेदम मारहाण केली. पीडितेचा आक्रोश ऐकून शेजारील एका वृद्ध आजीने मध्यस्थी करत आरोपींना जाब विचारला व मुलीला सोडून देण्यास सांगितले.


नाकाबंदीत फुटले बिंग; पोलिसांमुळे सुटका

दुपारी ३ च्या सुमारास आरोपी मनिषा यांना गाडीत बसवून इंडीच्या दिशेने घेऊन जात होते. त्याचवेळी रस्त्यावर कर्नाटक पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान संशयित गाडी थांबवून तपासणी केली. संधी साधत मनिषा यांनी तातडीने, "हे लोक माझे जबरदस्तीने अपहरण करून नेत आहेत," अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्परता दाखवत मनिषा यांची सुटका केली आणि त्यांना उमदी पोलीस ठाण्यात आणले.

​घटनेची माहिती मंगळवेढा पोलिसांना दिल्यानंतर मनिषा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती दत्तात्रय माने, दीर दिलीप माने यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.