🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकार ॲक्शन मोडमध्ये; विद्यावेतन, सुरक्षा आणि वसतिगृहाबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे कडक निर्देश!

निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकार ॲक्शन मोडमध्ये; विद्यावेतन, सुरक्षा आणि वसतिगृहाबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे कडक निर्देश!


मुंबई :- राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांचे प्रलंबित प्रश्न, विद्यावेतनाचा (स्टायपेंड) विलंब, वसतिगृहांची दयनीय अवस्था आणि सुरक्षिततेचा अभाव यावर वैद्यकीय शिक्षण विभागाने अखेर कडक पावले उचलली आहेत. 'सेंट्रल मार्ड'ने उपस्थित केलेल्या गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

​५ महिन्यांचे विद्यावेतन थकले; निश्चित तारीख ठरवण्याची मागणी!

२०२५-२६ च्या तुकडीतील काही निवासी डॉक्टरांचे मागील पाच महिन्यांचे विद्यावेतन रखडल्याचा मुद्दा 'मार्ड'ने बैठकीत अत्यंत आक्रमकपणे मांडला. डॉक्टरांचे विद्यावेतन दरमहा एका ठराविक तारखेला थेट बँक खात्यात जमा व्हावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. 




यावर, गेल्या तीन महिन्यांतील विद्यावेतन वितरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने संबंधित संस्थांना दिले आहेत. याशिवाय महागाई भत्ता आणि नवीन महाविद्यालयांतील मानधनातील तफावत दूर करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

​जे.जे. रुग्णालयात १ हजार डॉक्टर, पण सोय फक्त ३५० जणांचीच!

मुंबईतील प्रसिद्ध जे.जे. समूह रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या निवासाचा भीषण प्रश्न समोर आला आहे. रुग्णालयात १ हजारांहून अधिक निवासी डॉक्टर कार्यरत असताना केवळ ३५० जणांनाच वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे. प्रस्तावित २० मजली वसतिगृहाची मंजुरी आणि निधी मिळण्यास होणारा उशीर पाहता, तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून आरएमओ  आणि सीएमओ  यांची रिक्त निवासस्थाने डॉक्टरांना उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश अधिष्ठात्यांना  देण्यात आले आहेत. 




रुग्णालयांतील सुरक्षा रामभरोसे; 'मार्ड'च्या मागणीनंतर सीसीटीव्ही अन्‌ हेल्पलाइन!

डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी रुग्णालयांच्या आपत्कालीन विभागात प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात करणे अन्‌ सर्व सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे तसेच डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.



​याशिवाय सर्व महाविद्यालयांत समान व्यावहारिक शिक्षणासाठी 'कौशल्य प्रशिक्षण आराखडा' तयार करणे, रिक्त प्राध्यापक व विभागप्रमुखांची पदे भरणे, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रम राबवणे आणि तक्रारी निवारणासाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

​

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.