मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील नारायणगड येथील दसरा मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. एकनाथ शिंदे तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? ते भाजपकडून घेतलेत का? 500 कोटी मला दिसेल नसतील तर तुम्ही मला संपवताय की भाजप तुम्हाला संपवतंय असा सवाल मनोज जरांगे यांनी केला होता. याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, असा इशारा देखील रामदास कदम यांनी दिला.
रामदास कदम काय म्हणाले?
रामदास कदम बोलताना म्हणाले की आता जरांगे पाटील यांना सांगतो आम्ही कधी विरोधात बोललो नाही. ठीक आहे समाजाला न्याय द्यायला उपोषणाला बसतात, आम्ही कधी काय बोललो नाही. जरांगे तुम्ही एकनाथ शिंदेंबाबत, 500 कोटीबाबत बोललात, एक गोष्ट मी आपणाला सांगतो, तुम्ही एकनाथ शिंदेंसाहेबांना उद्धवस्त करायला तर हा मराठा समाज मागं हटला. तुला उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला इथं आलो आहे. अरे कोण आहेस तू कोण आहेस? असा सवाल रामदास कदम यांनी केला.
अरे उपोषणाला बसतोस आणि बाथरुममध्ये जाऊन गपचूप खातोस, गपचूप खातो, सगळ्यांना फसवतो. शिंदे साहेब माझी विनंती आहे, लावा त्याची चौकशी, असं म्हणत रामदास कदमांनी जरांगेंच्या चौकशीची मागणी केली. हा मराठ्यांचा नेता झाल्यापासून याची संपत्ती कुठं आहे, कुणा कुणाच्या नावावर आहे, कुठल्या नातेवाइकांच्या नावावर आहे, लावा चौकशी याची एकदा दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊद्या, असं रामदास कदम म्हणाले.
एक मराठा समाजाचा माणूस महाराष्ट्र ढवळून काढतोय, मराठा समाजाला न्याय देतोय, दहा टक्के आरक्षण मराठ्यांना एकनाथ शिंदेंनी दिलं. बेईमान माणसा तू कोणावर बोलतोय, याद राख एकनाथ शिंदे साहेबांवर बोलशील, 500 कोटींचा आरोप करतोस, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तू कोणाला बदनाम करतोस, कोणाची सुपारी घेऊन असा सवाल रामदास कदम यांनी केला.
एकनाथ शिंदे आमचं दैवत आहे, शिवसैनिकांचं दैवत आहे, मराठा समाजाचं दैवत आहे. त्यांच्याबाबत बोलशील तर महाराष्ट्र खपवून घेणार नाही, मराठा समाज खपवून घेणार नाही. अरे जरांग्या तुला माहिती आहे का मराठा समाजाचा पहिला मेळावा संभाजीनगरला कुणी काढला होता, तेव्हा कुठे झोपला होता, अशा शब्दात रामदास कदमांनी टीका केली.पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस? ही मराठा समाजाची संस्कृती आहे का? समाजानं तुला समाजाला न्याय देण्यासाठी पाठिंबा दिला, त्याचा गैरफायदा घेतो का तू, ज्या गावात उपोषण होतं, त्या गावानं त्याला हाकून दिला आहे. शिंदे,कदम, भोसले हे मराठा आहे, लाचार नाहीत तुझ्यासारखे असं रामदास कदम म्हणाले.
याद राख एकनाथ शिंदे दोन दोन हातानं देणारे आहेत, घेणारे नाहीत. सुपारी घेऊन त्यांना बदनाम करायला निघालास का? यापुढे गाठ मराठा समाजाशी आहे, शिवसैनिकाशी गाठ आहे हे सांगायला इथं आलोय, अशा शब्दात रामदास कदम यांनी हल्लाबोल केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.