शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या शिवाजी पार्कवरील ऐतिहासिक दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आतापर्यंतचा सर्वात आक्रमक व घणाघाती हल्ला केला. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जाण्याचा मुहूर्त ठरला असून एप्रिल 2027 च्या शेवटच्या आठवड्यात दोघेही सत्तेतून पायउतार होतील, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला.
दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात कायदा-सुव्यवस्था आणि राजकीय परिस्थितीवर वक्तव्य केलं आहे. येत्या 4 ते 5 महिन्यात देशात मोठी राजकीय गडबड होऊ शकते आणि असा काळ येईल, जेव्हा देशात पंतप्रधानही नसेल, असं सांगत राज ठाकरे यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली.
अमित शाह हेच बिश्नोई!- संजय राऊतांचे गंभीर आरोप
मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवर भाष्य करताना संजय राऊतांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना टार्गेट केले.ते म्हणाले, देशात लॉरेन्स बिश्नोई नावाचे काहीही अस्तित्वात नाही. अमित शाह हेच खरे बिश्नोई आहेत. या देशाचा गृहमंत्री ज्याच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, तोच माफिया आहे, असा अत्यंत गंभीर आरोप राऊतांनी केला.
देवांच्या हातात असणारी शस्त्रे आज गुंडांच्या हातात गेली असून अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे या गुंडांचे सरदार आहेत, अशी तिखट टीका त्यांनी केली. राम मंदिरातील दानपेटी आणि दागिन्यांमध्ये भाजपच्या काळात तब्बल 1400 कोटी रुपयांची लूट झाली, असा नवीन दावाही संजय राऊत यांनी केला. 'एप्रिल 2027'चा फॉर्म्युला आणि धनुष्यबाणाबाबत मोठे भाकीत मोदी सरकार पडण्याच्या दाव्यामागे संजय राऊत यांनी 'जनक्षोभ'हेच मुख्य कारण सांगितले आहे.
जनतेचा आक्रोश
देशातील तरुण (Gen-Z) आणि सामान्य नागरिक महागाई, बेरोजगारी व हुकूमशाहीला कंटाळून रस्त्यावर उतरले आहेत. जेव्हा जनता रस्त्यावर उतरते, तेव्हा कोणत्याही हुकूमशाहीचा अंत होतो. एप्रिल 2027 पर्यंत हा आक्रोश चरमसीमेवर पोहोचून सत्तापालट होईल, असे राऊतांनी जाहीर सभेत म्हटले.
'धनुष्यबाण' पुन्हा ठाकरे गटाकडे?
पक्ष आणि चिन्हाच्या न्यायालयीन लढाईवर भाष्य करताना राऊतांनी विश्वास व्यक्त केला की, पुढील वर्षाच्या दसरा मेळाव्यापर्यंत शिवसेनेचे मूळ चिन्ह 'धनुष्यबाण'पुन्हा उद्धव ठाकरेंकडे आलेले दिसेल. आम्ही धनुष्यबाण सोडणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात विचार, संघर्ष किंवा महाराष्ट्र धर्माची कोणतीही भूमिका नसून खरा 'महाराष्ट्र धर्म' फक्त ठाकरे गटाच्या मंचावरच आहे, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.
राज ठाकरेंचे वक्तव्य म्हणजे आगीत तेल..
संजय राऊत यांच्या विधानांच्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी बुधवारी केलेल्या वक्तव्याने या राजकीय समीकरणांना वेगळे वळण दिले आहे. राज ठाकरेंनी देखील राज्यातील खालावलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवले. गुन्हेगारी, उघडपणे होणारे गोळीबार आणि प्रशासकीय ढिम्मपणा यावर भाष्य करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.महाराष्ट्रात राजकीय स्वार्थासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घातले जात असून, जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, असा सूर राज ठाकरेंच्या वक्तव्यातून उमटला. विरोधी पक्षांसोबतच मनसेनेही आक्रमक भूमिका घेतल्याने महायुती सरकार दुहेरी कोंडीत सापडले आहे.दसरा मेळाव्यातून संजय राऊतांनी केलेला आणि अमित शाहांवर केलेला 'बिश्नोई' असा थेट हल्ला, यासोबतच राज ठाकरेंची राजकीय टोलेबाजी यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट यावर काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.