भारताचे सरन्यायाधीश यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि पत्रकार निखिल वागळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने या दोघांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात फौजदारी अवमान खटला सुरू करण्यासाठी १९७१ च्या न्यायालय अवमान कायद्यातील कलम १५ नुसार अॅटर्नी जनरल किंवा सॉलिसिटर जनरल यांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. त्यानुसार, असोसिएशनने अॅटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी यांच्याकडे संमती मागितली होती. या पत्राची दखल घेत त्यांनी खटला चालवण्यास होकार दिला आहे. राऊत आणि वागळे यांचे ट्विट्स प्रथमदर्शनी सर्वोच्च न्यायालय आणि विशेषतः सरन्यायाधीशांची प्रतिष्ठा मलीन करण्याच्या उद्देशाने केल्याचे व्यंकटरमणी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींसह इतर विरोधी पक्षनेत्यांना सरन्यायाधीशांनी भेटण्याची वेळ नाकारली होती. यानंतर वागळे आणि राऊत यांनी वादग्रस्त ट्विट्स केले. वागळे यांनी अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर केला, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी 'न्यायाधीश भाजप नेत्यांच्या पार्ट्यांना हजेरी लावतात आणि त्यांच्यासोबत बॅडमिंटन खेळतात,' अशी टिप्पणी केली होती.संजय राऊत यांचे हे दावे तथ्यांवर आधारित नसल्याचे महाधिवक्त्यांनी मान्य केले आहे. एका न्यायाधीशाच्या जुन्या छायाचित्राचा विपर्यास करून ही विधाने करण्यात आली होती. विशेष म्हणजे, दिल्ली उच्च न्यायालयाने ते छायाचित्र हटवण्याचे आदेश आधीच दिले आहेत. त्यामुळे त्याच छायाचित्राचा आधार घेऊन न्यायव्यवस्थेला वादात ओढण्याचा हा प्रयत्न असल्याचे वरवर पाहता दिसत आहे.दरम्यान, ॲटर्नी जनरल यांनी खटल्याला मंजुरी दिली याचा अर्थ हे दोघेही दोषी आहेत असा होत नाही. यापुढील कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. दुसरीकडे, एका वकिलाकडून कायदेशीर नोटीस आल्यानंतर निखिल वागळे यांनी माफी मागत आपल्या सोशल मीडिया पोस्ट हटवल्या आहेत. मात्र, या याचिकेमुळे राऊत आणि वागळे यांच्यासमोरील कायदेशीर पेच वाढला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.