सांगली शहराचे उच्चविद्याविभूषित आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्रामबाग परिसरात सध्या कायदा आणि सुव्यवस्था अक्षरशः धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिसराच्या विविध भागांत आणि गल्लीबोळांत पडदे लावून, सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळ फेकून खुलेआम कॅसिनो आणि जुगाराचा काळाबाजार जोमात सुरू आहे. या बेकायदेशीर धंद्यांमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असताना, यावर अंकुश ठेवणारी यंत्रणा नेमकी काय करत आहे? असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
पडद्याआड चालतोय जुगाराचा खेळ:
विश्रामबागमधील अनेक टपऱ्या, गाळे आणि बंदिस्त खोल्यांमध्ये बाहेरील बाजूने पडदे लावून आतमध्ये जुगार आणि कॅसिनोचे अड्डे थाटण्यात आले आहेत. पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून हा गोरखधंदा दिवस-रात्र अविरत सुरू आहे.
'लक्ष्मी दर्शना'ची कमाल: या अवैध धंद्यांचे जाळे इतके पसरले आहे की, संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष व्हावे यासाठी 'लक्ष्मी दर्शना'चे भाले अगदी उंच-उंच उडू लागले आहेत. या आर्थिक हितसंबंधांमुळेच या अड्ड्यांवर कारवाई करण्यास कुणीही पुढे येत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
उद्ध्वस्त होणारी तरुण पिढी:
कॉलेजवयीन तरुण आणि अल्पवयीन मुले या जुगाराच्या विळख्यात अडकत आहेत. अल्पवयातच पैशांची चटक लागल्यामुळे ही तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत असून त्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे. याकडे पालकांनी आणि समाजानेही चिंता व्यक्त केली आहे.वरिष्ठ पोलीस अधिकारी कधी कारवाई करणार? स्थानिक स्तरावर या अवैध धंद्यांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप होत असून, आता खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने धाडी टाकणे गरजेचे बनले आहे.
नागरिकांचा रोष आणि आक्रमक पवित्रा
सामान्य नागरिक आणि पालक वर्गामध्ये या प्रकाराबद्दल प्रचंड संताप खदखदत आहे. "पोलिसांच्या नाकावर टीच्चून हे अवैध धंदे कसे चालतात? यामागे राजकीय किंवा खाकी वरदहस्त कुणाचा?" असा थेट प्रश्न आता विचारला जात आहे. जर लवकरात लवकर या कॅसिनो आणि जुगार अड्ड्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. आता या प्रकरणी पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार आणि हे 'लक्ष्मी दर्शना'चे भाले रोखण्यासाठी वरिष्ठ अधिकारी कोणती पावले उचलणार, याकडे संपूर्ण सांगलीकरांचे लक्ष लागून आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.