दिवाळीच्या तोंडावर 'महागाईचा झटका'! डाळी, खाद्यतेलासह कांदा-टोमॅटोचे भाव गगनाला; गृहिणींचे धाबे दणाणले!
नागपूर : दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू असतानाच नागपूरकरांना महागाईचा मोठा फटका बसत आहे. डाळी, धान्य आणि खाद्यतेलाच्या वाढलेल्या दरांमध्ये आता कांदा, लसूण, बटाटा आणि टोमॅटोचीही भर पडली आहे. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकापासून दिवाळीच्या फराळापर्यंतचा खर्च वाढला आहे.
गेल्या दीड महिन्यात तूरडाळीचे दर १६२ रुपयांवरून १७५ रुपये किलोवर गेले, तर कांद्याचे दर ८१ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेतही अनेक धान्ये आणि कडधान्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. नेमक्या कोणत्या वस्तू किती महागल्या? कोणत्या वस्तूंसाठी आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत? याबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपुरात डाळी आणि धान्यांचे दर किती वाढले?
गेल्या दीड महिन्यात चांगल्या प्रतीच्या तूरडाळीचे दर प्रतिकिलो १६२ रुपयांवरून १७५ रुपये झाले. चणाडाळीचे दर ९२ रुपयांवरून ११४ रुपये, तर शरबती गव्हाचे दर ६५ रुपयांवरून ७८ रुपये किलोवर पोहोचले. कोलम तांदळाचे दर ६० रुपयांवरून ७० रुपये, तर लुचई तांदळाचे दर ४० रुपयांवरून ४५ रुपये झाले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत किती दरवाढ झाली?
ऑक्टोबर २०२५ आणि ऑक्टोबर २०२६ मधील तुलनात्मक दर पाहता, तूरडाळीचे दर प्रतिकिलो १३० रुपयांवरून १७५ रुपये, तर चणाडाळीचे दर ७० रुपयांवरून ११४ रुपये झाले आहेत. श्रीराम तांदळाचे दर ६० ते ६२ रुपयांवरून ८० ते ८५ रुपये, बीपीटी तांदळाचे दर ४० ते ४५ रुपयांवरून ६५ ते ७० रुपये, तर तुकडा तांदळाचे दर २५ ते २७ रुपयांवरून ३५ ते ४० रुपये झाले आहेत. देशी हरभऱ्याचे दर ६० ते ६५ रुपयांवरून ७५ ते ८० रुपये, मटकीचे दर ७५ ते ८० रुपयांवरून ११५ ते १२० रुपये, तर वाटाण्याचे दर ५२ ते ५५ रुपयांवरून ६५ ते ७० रुपये झाले आहेत. मुगाचे दर ८५ ते १०० रुपयांवरून १०५ ते १३० रुपये, तर साबुदाण्याचे दर ६२ ते ६६ रुपयांवरून ७५ ते ७८ रुपये झाले आहेत.
भाजीपाल्याच्या दरवाढीचा फटका किती मोठा आहे?
रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. कांद्याचे दर किलोमागे ४० ते ५५ रुपयांवरून ६२ ते ८१ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. लसणाचे दर १८३ रुपयांवरून २२६ रुपये किलो झाले आहेत. बटाट्याचे दर ३४ रुपयांवरून ४४ रुपये, तर टोमॅटोचे दर २० रुपयांवरून ४३ ते ५१ रुपये किलोदरम्यान गेले आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदीसाठीही ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
खाद्यतेलाच्या दरांत किती वाढ झाली?
खाद्यतेलाच्या डब्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. सोयाबीन तेलाच्या १३ किलोच्या डब्याचे दर २,२८० रुपयांवरून २,३५० रुपये झाले आहेत. सूर्यफूल तेलाच्या १५ किलोच्या डब्याचे दर २,५६० रुपयांवरून २,६६० रुपये, शेंगदाणा तेलाचे दर २,७५० रुपयांवरून २,७६० रुपये, तर राईस ब्रॅन्ड तेलाच्या डब्याचे दर
दिवाळीच्या खरेदीवर याचा काय परिणाम होणार?
दिवाळीसाठी फराळाचे साहित्य, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना ग्राहकांना अधिक खर्च करावा लागत आहे. धान्य, डाळी, खाद्यतेल आणि भाजीपाला या सर्वच बाबी महागल्याने घरखर्चाचे गणित बिघडले आहे. उत्पन्नात तुलनेने वाढ नसताना रोजच्या गरजांवरील खर्च वाढत असल्याने सर्वसामान्य कुटुंबांना इतर बाबींवर काटकसर करावी लागत आहे. सणाचा आनंद साजरा करताना वाढत्या महागाईचा भारही सोसावा लागत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.